दुबार मतदारांबाबत कराड व मलकापूर निवडणूक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

कराड/प्रतिनिधी : –
आगामी कराड व मलकापूर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पारदर्शक आणि अचूक कामकाज होण्यासाठी बी.एल.ओ., पर्यवेक्षक, विभाग प्रमुख व सेक्टर ऑफिसर्स यांची संयुक्त बैठक कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे अध्यक्षस्थानी होते.
बैठकीस मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, मतदार यादी ही कोणत्याही निवडणुकीचा मूलभूत घटक आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार कराड नगरपालिका क्षेत्रात १,९९८ तर मलकापूर नगरपालिकेत ५५५ दुबार मतदार आढळले असून, त्या मतदारांची दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) लवकरच गावनिहाय भेटी देणार असून, संबंधित दुबार मतदारांनी आपले परिशिष्ट–१ तातडीने भरून सादर करावे. तसेच मयत, दुबार व गैरहजर मतदारांबाबत आवश्यक कार्यवाही वेळेत पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच कराड नगरपालिकेसाठी १२ आणि मलकापूर नगरपालिकेसाठी ५ सेक्टर ऑफिसर्समार्फत संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदान केंद्रांवरील लाईट, पाणी, रॅम्प, फर्निचर आदी मूलभूत सुविधा तपासाव्यात, तसेच मतदार जनजागृतीवर विशेष भर द्यावा. निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात मतदान व्हावे, हा आपला उद्देश असावा. हा लोकशाहीचा पवित्र उत्सव सर्वांनी मिळून यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
बैठकीस मलकापूर नगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार कल्पना ढवळे, कराड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे व प्रशांत व्हटकर, मलकापूर नगरपालिकेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कपिल जगताप, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, बाबुराव राठोड, व्ही. आर. राजपूत उपस्थित होते. सहाय्यक महसूल अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.



