सातारा जिल्हाहोम

राजेंद्रसिंह यादव शिवसेनेचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार 

शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : –

कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने नगराध्यक्षपदाचा दावा सशक्त करत राजेंद्रसिंह यादव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कराडचा विकास, कराडचे गावपण आणि परंपरा जपण्यासाठी ही निवडणूक आहे, असे सांगत यादव यांनी जनतेसमोर आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी येथील यशवंत विकास आघाडी व शिवसेनेच्या मेळाव्यात ही घोषणा केली. यावेळी जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, माजी नगराध्यक्षा संगीता देसाई, माजी सभापती विजय वाटेगावकर, शहर प्रमुख राजेंद्र माने, किरण पाटील यांच्यासह सर्व माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपर्कप्रमुख कणसे म्हणाले, राजेंद्रसिंह यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कराड शहराच्या विकासासाठी १०० कोटींच्या प्रस्तावांची मांडणी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळत २०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. प्रवेशाच्या वेळी इतका निधी दिला, तर यादव नगराध्यक्ष झाल्यावर कराडच्या विकासासाठी किती मोठा निधी मिळेल, याचा विचार कराडकरांनी करावा.

यादव म्हणाले, शहराच्या हितासाठी आपण छातीचा कोट करू. काही जण मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत; पण जीवात जीव आहे, तोपर्यंत आपण धनुष्यबाणासोबतच राहणार. लढणे आपल्या रक्तात आहे आणि तेच कराडच्या जनतेच्या आशीर्वादाने सिद्ध करू, असेही त्यान इ सांगितले.

ते म्हणाले, शहराचा २०५६ सालपर्यंतचा विकास आराखडा तयार असून, अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. आगामी काळातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

Related Articles