कराडला कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु
टँकरचीही सोय, पुलावरून पाइपलाइन करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न

कराड/प्रतिनिधी : –
शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नदीतील पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेल्याने येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी कराडला भेट देऊन पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर शहराला 125 हॉर्सपॉवर पंपाद्वारे पाणीउपसा असून सुरु आणखी 125 हॉर्सपॉवर पंपाद्वारे पाणी उपसा करून नागरिकांना बुधवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. त्यानुसार शहरात काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
बुधवारी येथील पंपहाउसला भेट दिल्यानंतर, तसेच सुरु असलेल्या कामांची आ. बाळासाहेब पाटील यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी माध्यमांशी बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, दोन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाइपलाइन तात्काळ सुरू करणे गरजेचे होते. यासाठी जुन्या पंपहाऊसमधून 125 हॉर्सपॉवर पंपाद्वारे पाणी उपसा सुरू असून आणखी 125 हॉर्सपॉवर पंपाद्वारे पाणीउपसा करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच ज्याठिकाणी पाणी पोचणार नाही, त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच नगरपालिका अधिकारी, महामार्ग देखभाल दुरुस्ती विभाग आणि महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी नवीन फुलावरून पाइपलाइन टाकण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली आहे. यानुसार पुलाची भार वाहन क्षमता पाहून नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धतीनुसार निघालेल्या कमी वजनाच्या पाइप टाकून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रयत्न केले जाणार आहेत. या कामासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.