सातारा जिल्हाहोम

उंब्रजमध्ये १३३.४५ कोटींचा पारदर्शक उड्डाणपूल मंजूर, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कराड/प्रतिनिधी : –

माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पुणे-कागल राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे शहर असलेल्या उंब्रज (ता.कराड) येथील नव्या पारदर्शक उड्डाण पूलासाठी सुमारे १३३.४५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे कळवली आहे.

उंब्रज येथे वाढत चाललेले नागरीकरण व शहराच्या मध्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग यामुळे स्थानिक लोकांना सुरक्षित वाहतुकीसह अन्य सुविधांचा बोजवारा उडत आहे. याकडे लक्ष वेधून तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी याठिकाणी पारदर्शक उड्डाणपूल करावा अशी मागणी लावून धरली होती.

उंब्रज हे जवळपासच्या ३० ते ४० गावांसाठी एक प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण  आहे. त्याची लोकसंख्या सुमारे ४५ हजार आहे. या शहरात अनेक सरकारी आणि खाजगी कार्यालये, बँका पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, टेलिफोन एक्सचेंज ऑफिस, एमएसईबी ऑफिस, सिटी सर्व्हे ऑफिस, सब रजिस्ट्रार ऑफिस, कृषी ऑफिस, धोम सिंचन ऑफिस, महाविद्यालये, शाळा आणि रुग्णालये आहेत. हे शहर वेगाने वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ उंब्रजमधून जातो आणि शहराला दोन भागात विभागतो. चिपळूण-पंढरपूर राज्य महामार्ग १४३ देखील उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्ग ४ ओलांडतो. त्यामुळे उंब्रज हे जास्त वाहतूक आणि अपघाताचे ठिकाण बनले आहे. सध्या, राष्ट्रीय महामार्ग ४ महामार्गावर फक्त एकच अंडरपास असलेला एक उड्डाणपूल आहे, जो अत्यंत अपुरा आणि अयोग्यरित्या स्थित आहे. पावसाळ्यात अंडरपासमध्ये पाणी साचते ज्यामुळे अधिक गैरसोय होते. म्हणूनच, सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्गावर अनेक अंडरपाससह पारदर्शक उड्डाणपूल बांधण्याची नितांत आवश्यकता असल्याचे पटवून देत श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती.

याबाबत लोकसभेत देखील मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच उंब्रज येथील ग्रामस्थांनी श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन याठिकाणी पारदर्शक उड्डाणपूल व्हावा अशी मागणी याअगोदर केली होती. त्यानुसार श्रीनिवास पाटील यांनी वेळोवेळी केंद्रीय पातळीवर पत्र व्यवहार करण्यासह प्रत्यक्ष पाठपुरावा केला होता. त्यानंतर संबंधित विभागाने प्रशासकीय पातळीवर पूलाच्या कामाचा सर्व्हे करून तांत्रिक बाबी तपासल्या गेल्या होत्या. आता या उड्डाण पूलासाठी निधी मंजूर झाल्याने सदर कामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहीती माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

Related Articles