उरुण ईश्वरपूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे खंडेराव जाधव (नाना) यांची निवड
स्विकृत नगरसेवकपदी संग्रामसिंह पाटील व सचिन कोळी बिनविरोध, तिसऱ्या स्वीकृत नगरसेवक निवडीला स्थगिती

ईश्वरपूर/प्रतिनिधी : –
उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नगरसेवक खंडेराव रामचंद्र जाधव (नाना) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्विकृत नगरसेवक पदी युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह दिलीपराव पाटील व माजी युवक शहराध्यक्ष सचिन अशोकराव कोळी यांची बिनविरोध करण्यात आली. मात्र तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीला स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय पिठासन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी घेतला.

माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरुण ईश्वरपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आली आहे. या निवडी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिशबाजी करत,तुतारीचा निनाद आणि हलगी – घुमक्याच्या ठेक्यात मिरवणूक काढून आंदोत्सव साजरा केला.
आज (शुक्रवारी) दुपारी बारा वाजता ईश्वरपूर येथील नगरपालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या पदाच्या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षते खाली व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला नोटीस वाचन करून निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांचे वाचन करण्यात आले.

उपनगराध्यक्ष पदासाठी खंडेराव जाधव (नाना) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने तो वैध ठरवण्यात आला. निर्धारित वेळ संपल्यानंतर जाधव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
या सभेत स्विकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्रामसिंह दिलीपराव पाटील व सचिन कोळी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मात्र तिसऱ्या नगरसेवक पदाचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. या निर्णयाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक आनंदराव पवार यांनी तीव्र विरोध दर्शविला. तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाची निवड तत्काळ जाहीर करावी,अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मात्र नगराध्यक्ष मलगुंडे यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. सभागृहात पक्षीय बलाबल गट करण्याबाबत १२ व १३ जानेवारीच्या शासन दरबारी निघालेल्या अध्यादेशबाबतचा अभिप्राय घेण्यासाठी तिसऱ्या उमेदवारांची निवड तहकूब केल्याचे नगराध्यक्ष मलगुंडे यांनी सांगत सभा संपवली.
दरम्यान, नगरपालिकेसाठी पंधरा प्रभागातून ३० नगरसेवक व थेट नगराध्यक्ष असे ३१ संख्याबळ आहे. २२ नगरसेवक व नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( श. प.) आहेत. स्वीकृत नगरसेवकांपैकी दोन सदस्य सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून निवडले जाणे अपेक्षित होते. विरोधी गटांमध्ये भाजपाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तीन व शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आल्याने महायुतीचा स्वतंत्र गट स्थापन होण्याची शक्यता होती. मात्र भाजप व शिवसेनेने एकत्रित गट स्थापन केला आहे. त्याचे ५ नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षाचे तीन नगरसेवक यांचा एक गट आहे.
गटनोंदणी व रद्द झालेल्या आदेशाबाबत निर्णयासाठी वेळ मिळणे अपेक्षित असल्याचे सांगत तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाच्या अर्जावर सध्या निर्णय न घेण्याचा पवित्रा नगराध्यक्ष मलगुंडे यांनी घेतला. भाजप-शिवसेना गटातर्फे अमित ओसवाल यांचा अर्ज वैध ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मनिषा जयवंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तिसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून विजय संपतराव देसाई (सोन्याबापू) व भाजप-शिवसेना गटाचे अमित ओसवाल आणि असे दोन अर्ज शिल्लक राहिले आहेत. तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाची निवडणूक स्थगित झाल्यामुळे अखेर ही जागा सत्ताधारी गटाकडे जाणार की विरोधकांना संधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
नगरपालिकेत सन्मान सोहळा : प्रतिकदादा पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा
युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी ईश्वरपूर नगर पालिकेत येऊन नूतन उप नगराध्यक्ष खंडेराव जाधव,स्विकृत नगरसेवक संग्राम सिंह पाटील,सचिन कोळी यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.



