कृष्णा पुलावरील संरक्षक जाळ्यांच्या मागणीला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा

कराड/प्रतिनिधी : –
शहरातील नवीन कृष्णा पुलावरून आत्महत्यांचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळ्या बसवाव्यात, या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल आता राज्य व स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेतली आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, तसेच रक्षक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, बुधवारी एका महिलेने कृष्णा पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने या प्रश्नाची भीषणता अधिकच अधोरेखित झाली. आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी रक्षक प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते शुक्रवारी कोणत्याही क्षणी पुलावरून उडी घेण्याचा इशारा देणार असल्याची माहिती मनोज माळी यांनी प्रशासनाला दिली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र पाठवून कृष्णा पुलावर संरक्षक जाळ्या बसवण्याबाबत सूचना केल्या होत्या. बुधवारी घडलेल्या घटनेनंतर रक्षक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी खासदार भोसले यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर खासदार भोसले यांनी महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संरक्षक जाळ्यांच्या अंदाजपत्रकाबाबत विचारणा केली. यावर अधिकाऱ्यांनी लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मनोज माळी यांनी दिली.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनीही उपोषणस्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि या विषयाचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावर पालकमंत्री देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना संरक्षक जाळ्यांचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही बुधवारी रात्री आंदोलनस्थळी भेट देत मनोज माळी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर व मुंबई येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुलावर घडणाऱ्या आत्महत्यांचे प्रकार आणि संरक्षक जाळ्यांची अत्यावश्यक गरज अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान, तात्पुरत्या उपाययोजनांच्या अनुषंगाने नदीपात्रात बचावकार्य सुलभ व्हावे, यासाठी रेस्क्यू बोट व चार कर्मचारी तैनात करण्याची मागणी करण्यात आली होती. नगराध्यक्ष यादव यांनी या मागणीची त्वरित दखल घेत मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवारपासून कृष्णा नदीपात्रात रेस्क्यू बोट व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
एकंदरीत, कृष्णा पुलावरील संरक्षक जाळ्यांचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर आला असून, लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



