सातारा जिल्हाहोम

ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांना पद्मश्री  पुरस्कार न दिल्यास आंदोलन – पै. चंद्रहार पाटील

कराड/प्रतिनिधी : – 

देशाला कुस्ती या क्रीडा प्रकारात पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांना आजवर ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सरकारने तातडीने त्यांना हा सन्मान जाहीर करावा, अशी जोरदार मागणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केली आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील सर्व पैलवान एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

कार्वे नाका (कराड) येथील ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या स्मारकास त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पै. चंद्रहार पाटील म्हणाले, स्वातंत्र्यानंतर अवघ्या चार वर्षांत, सन १९५२ मध्ये सातारा जिल्ह्यातील कराडचे सुपुत्र पै. खाशाबा जाधव यांनी भारताला वैयक्तिक खेळ प्रकारातील पहिले ऑलिंपिक पदक मिळवून दिले. असे ऐतिहासिक योगदान देणाऱ्या महान खेळाडूला आजही पद्मश्री पुरस्कार न मिळणे, ही खेदजनक बाब आहे. त्यांच्या सन्मानासाठी कुस्तीप्रेमी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत; मात्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सातारा जिल्ह्यात सध्या चार कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच केंद्रातही अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी असताना पै. खाशाबा जाधव यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, यासाठी कोणीही ठोस पाठपुरावा केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर राज्यभरातील पैलवान एकत्र येऊन आंदोलन छेडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले, पै. खाशाबा जाधव यांना पद्मश्री पुरस्कार देण्याबाबत त्यांचे सुपुत्र रणजीत जाधव यांच्यासह अनेकदा निवेदने देण्यात आली असून विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. देशाला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या या महान खेळाडूला सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी देश व राज्यातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदकेसरी पै. संतोष वेताळ यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात १५ जानेवारी हा पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन ‘क्रीडा दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. खाशाबा जाधव यांच्यानंतर अनेक व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला असून, सरकारने जे निकष इतरांसाठी लावले आहेत, तेच निकष खाशाबा जाधव यांच्यासाठीही लावून त्यांचा योग्य सन्मान करावा, अशी मागणी केली.

दरम्यान, शंभराव्या जयंतीनिमित्त कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन केले. प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, तसेच दोन्ही नगरपालिकांचे नगरसेवक आणि अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

Related Articles