काले विद्युत उपकेंद्रात गावांना शेतीपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा योजनेचा शुभारंभ

कराड/प्रतिनिधी : –
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसाही विद्युत पुरवठा मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. काले येथील महापारेषण विद्युत उपकेंद्रात आवश्यक तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, शेतीपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा योजनेचा शुभारंभ शुक्रवारी आमदार डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
या निर्णयामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील १६ गावांमधील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आतापर्यंत रात्रीच्या अंधारात शेतात पाणी सोडावे लागत असल्याने अपघात, विजेचा धक्का तसेच वन्यप्राण्यांमुळे होणारे धोके वाढले होते. दिवसा वीजपुरवठा सुरू झाल्याने या सर्व समस्यांवर मोठ्या प्रमाणात मात होणार आहे.
काले येथील महापारेषण सबस्टेशनच्या क्षमतेत आवश्यक तांत्रिक बदल करून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ रात्री वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात आला आहे. शेतकरी हा राज्याचा कणा असल्याने त्यांना न्याय देण्याचा महायुती सरकारचा हा निर्णय सकारात्मक आणि क्रांतिकारी आहे.
यावेळी त्यांनी काले सबस्टेशनच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. महिलांसाठी स्वच्छतागृहे, कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची सोय, उपकेंद्राच्या ३ ते ४ एकर जागेचा विकास तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गलांडे, गणपतराव हुलवान, पैलवान धनंजय पाटील, नरेंद्र पाटील, हंबीरराव पाटील, कृष्णा बँकेचे संचालक प्रमोद पाटील, दिलीप पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील, उपकार्यकारी अभियंते स्वप्निल जाधव, विशाल ग्रामोपाध्याय, सहाय्यक अभियंता गणेश तोंडले यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत काले उपकेंद्राशी संलग्न असलेल्या १६ गावांमधील शेतकऱ्यांना सातही दिवस सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत थ्री-फेज वीजपुरवठा मिळणार आहे. यामध्ये काले, नारायणवाडी, कालेटेक, आटके, नांदगाव, संजयनगर, चौगुले मळा, भैरवनाथनगर, धोंडेवाडी, कोडोली, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, रेठरे खुर्द, वाठार आणि मालखेड या गावांचा समावेश आहे.



