मलकापूर शहराच्या विकासासाठी 25 वर्षांचे व्हिजन -आमदार अतुलबाबा भोसले
भाजपचा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : – मलकापूर नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून साठ लाखांचा निधी मंजूर करून घेणार आहोत. आगामी 25 वर्षांचा विकास आराखडा लक्षात घेऊन सर्व विजयी लोकप्रतिनिधींनी काम करावे. जुन्या-नव्यांची सांगड घालत शहराचे सुशोभीकरण आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणे, हा उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार अतुलबाबा भोसले यांनी केले.
मलकापूर येथे गुरुवारी संध्याकाळी आयोजित भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात आमदार भोसले मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते अशोकराव थोरात, माजी नगराध्यक्ष नीलम येडगे, आबासो गावडे, माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र यादव, शंकरराव चांदे, अजित थोरात, प्रशांत चांदे, राजू मुल्ला, युवा नेते तानाजी देशमुख, तसेच डॉ. सारिका गावडे, डॉ. स्वाती थोरात, विद्या थोरवडे, स्मिता पाटील, स्वाती तुपे, गीतांजली पाटील आदींची उपस्थिती होती.
आमदार भोसले म्हणाले, विधानसभेतील विजयानंतर मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना एकत्र घेण्याचा निर्धार केला होता, त्याला आता प्रत्यक्षात यश मिळत असून, यामुळे स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांचे स्वप्न झाले आहे. तसेच विकासाच्या दृष्टीने प्रत्येकाने मागेपुढे सरकायची तयारी ठेवावी. कोणाच्याही मानसन्मानाला धक्का न लागता सर्वांना सोबत घेऊन विकासाची गाडी पुढे नेणे, ही माझी जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मलकापूर नगरपालिका निवडणुकीतील 22 जागांसाठी तब्बल 133 इच्छुक आहेत. मात्र पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली, त्यांच्या पाठीशी सर्वांनी ताकदीने उभे राहिले पाहिजे. मलकापुरवर आमचे विशेष प्रेम असल्याने हे शहर जगाच्या नकाशावर आणणे, हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळवणार आहोत. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर 24×7 पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. मलकापूरला सोलर सिटी करण्याचा आमचा मानस आहे. तसेच शहरातील रस्त्यांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. मंदिरांचा विकास आराखडा तयार करून पर्यटन वाढीस चालना देऊ. आगाशिव येथे रोपवे प्रकल्प उभारून शहर पर्यटन नकाशावर आणू, याबाबत त्यांनी अस्वस्थ केले.
ज्येष्ठ नेते अशोकराव थोरात म्हणाले, मलकापूरचे नागरीकरण झपाट्याने वाढत असून, नागरिकांना सोयीसुविधा पुरवणे काळाची गरज आहे. आमच्या कार्यकाळात तत्कालीन आमदार पी.डी. पाटील यांच्या प्रयत्नातून 24×7 पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. वाढत्या लोकसंख्येनुसार या योजनेचा विस्तार करणे आवश्यक आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थेसाठी ‘मेट्रो सिटी’च्या धर्तीवर योजना राबवावी. जिल्ह्यातील सर्व आमदारांमध्ये अतुल भोसले हे सर्वाधिक सक्रिय आहेत, त्यामुळे रेठरे बुद्रुकप्रमाणे मलकापूरकडेदेखील त्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, भाजपचा हा मेळावा मलकापूर शहराच्या विकासदृष्टीचा ऐतिहासिक टप्पा आहे. सरपंच ते उपनगराध्यक्ष या प्रवासात आम्ही विकासाला प्राधान्य दिले. विधानसभेनंतर आमदार अतुल भोसले यांनी विकासाची दिशा ठरवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मलकापूरच्या विकासाला गती देऊ. शहरासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळवून मलकापूरचे स्वरूप बदलणार आहे. मलकापूरची विकासाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, या कार्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष नीलम येडगे, माजी नगरसेवक राजेंद्र यादव यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. मेळाव्यास शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



