सातारा जिल्हाहोम

कराडचा नगराध्यक्ष भाजपचाच असेल – आमदार अतुल भोसले

कराड/प्रतिनिधी : –

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजप कोणतीही तडजोड करणार नाही. मात्र, इतर जागांवर आवश्यक तेथे समन्वयाचा मार्ग काढला जाईल, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अतुल भोसले यांनी केले.

येथील विठ्ठल चौकात मंगळवारी झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शहराध्यक्षा सुषमा लोखंडे, माजी नगरसेवक सुहास जगताप, शिवाजी पवार, इंग्रजीत गुजर, राजेंद्र माने, सुभाषराव डुबल आदींसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार भोसले म्हणाले, कराड नगरपालिकेच्या ३१ जागांसाठी भाजपच्या १०४ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. काही कार्यकर्त्यांना अपेक्षित तिकीट मिळाले नाही, तरी नाराज न होता त्यांनी पक्षासाठी एकदिलाने काम करावे. आम्ही मित्रपक्षांसह मेळ घालण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र अद्याप तो पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. सर्वांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, हाच आमचा हेतू आहे.

नगराध्यक्षपदासाठी १५ इच्छुक आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, अरुण जाधव, अतुल शिंदे, बंडाकाका डुबल हे प्रमुख इच्छुक आहेत. परंतु, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि कोअर कमिटीचा निर्णयच अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, चांगल्या विचारांची माणसे पक्षासोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार मलकापूरमध्ये मनोहर शिंदे यांच्या मतपरिवर्तनात आपण यशस्वी झालो, तसेच इतर इच्छुकांनाही पक्षात सामावून घेऊ. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणून प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत. पुढेही शहरात विकासाची गंगा वाहावी, यासाठी पालिकेत आपल्या विचारांचे प्रतिनिधी निवडून यावेत, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Related Articles