आसामच्या जलजीवन मिशन योजनेच्या अधिकाऱ्यांची मलकापूर नळपाणीपुरवठा योजनेला भेट

कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर नगरपरिषदेत राबविण्यात आलेल्या देशातील आदर्श २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेला आसाम राज्यातील जलजीवन मिशन आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता, तसेच २६ कार्यकारी अभियंता यांनी भेट देऊन तांत्रिक अभ्यास केला.
या अभ्यासदौर्यात आसामचे IAS अधिकारी कैलास कार्तिक, जलजीवन मिशनचे संचालक अर्नव बरुआह, मुख्य अभियंता पार्थ प्रतिम बरुआह, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या दौर्यात अधिकारी मंडळाने मलकापूर २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची रचना, बिलिंग सिस्टीम, वॉटर मीटर व्यवस्थापन, प्रेशर सेन्सर, AMR मीटर तंत्रज्ञान, तसेच नागरिकांच्या सहभागातून योजनेचे प्रभावी व्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास केला.
शहरातील प्रत्येक नागरिकाला दररोज प्रति व्यक्ती ११० लिटर प्रमाणे अखंडित पाणीपुरवठा करणारी ही योजना २००९ पासून यशस्वीपणे कार्यरत आहे. या योजनेला नॅशनल अर्बन वॉटर अवॉर्ड २०११ आणि पंतप्रधान पुरस्कार (स्व. मनमोहन सिंह यांच्या हस्ते) प्राप्त झाले आहेत. तसेच उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते BEST LOCAL URBAN BODY हा राष्ट्रीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे.
अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान सांडपाणी प्रक्रिया केंद्र (३ MLD) व मैलागाळ प्रक्रिया केंद्र (१० KLD) यांचा देखील अभ्यास केला. प्रकल्प व्यवस्थापक रविंद्रनाथ टेळे यांनी या केंद्रांची माहिती दिली. सेवानिवृत्त उपअभियंता यु.पी. बागडे यांनी योजनेची तांत्रिक सादरीकरण केले.
अभ्यासानंतर आसामच्या अधिकाऱ्यांनी मलकापूर पालिकेच्या प्रशासनिक इच्छाशक्ती, नागरिकांचा सहभाग आणि सातत्यपूर्ण कार्यप्रणालीचे कौतुक केले. तसेच या पाणीपुरवठा मॉडेलचा नमुना आसाम राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी माजी आमदार स्व. भास्करराव शिंदे यांच्या संकल्पनेचा, तसेच नगरपालिकेच्या पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे माजी उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती मनोहर शिंदे यांनी सांगितले. त्यांनी मलकापूर योजनेचे यश हे P+P+P = पब्लिक + पॉलिटिक्स + प्रशासन या त्रिसूत्रीमुळे शक्य झाले असल्याचे नमूद केले.



