१३ गावांच्या पाण्यासाठी मनोज घोरपडेंचा बुलंद आवाज
विधानसभेतील पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांकडून आंब्याचे रोपटे देऊन सत्कार

कराड/प्रतिनिधी : –
कराड आणि कोरेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त १३ गावांना जिहे-कठापूर व टेंभू उपसा सिंचन योजनांमधून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रश्न आमदार मनोज घोरपडे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडला. या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी आंब्याचे रोपटे भेट देऊन त्यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे, अंभेरी, बेलेवाडी, वेळू, पवारवाडी, जयपूर, पिंपरी, आर्वी आणि कोंबडवाडी या नऊ गावांचा जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेत, तर कराड तालुक्यातील कोरेगाव, टेंभू, सयापूर आणि कामथी या चार गावांचा टेंभू उपसा सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
या भागातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून, अनियमित पर्जन्यमान, वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनासह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ मिळाल्यास हजारो शेतकरी कुटुंबांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार मनोज घोरपडे यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित करत संबंधित १३ गावांचा तातडीने योजनांमध्ये समावेश करावा, आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि योजना पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी केली.
या चर्चेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित गावांना लवकरात लवकर सिंचनाच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही सभागृहात दिली.
दरम्यान, आपल्या पाणीप्रश्नासाठी विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठवल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी कराड येथे आमदार घोरपडे यांची भेट घेत आंब्याचे रोपटे भेट देऊन त्यांचा सत्कार केला. समृद्धी आणि शाश्वत विकासाचे प्रतीक म्हणून आंब्याचे रोपटे अर्पण करत, या योजनांचे पाणी आमच्या शेतात पोहोचल्यास आमच्या आयुष्यातही समृद्धीचे दिवस येतील, अशी भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.



