‘दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी’ निर्णय शेतकऱ्यांसाठी नवी उमेद
मुख्यमंत्री फडणवीस यांचे रामकृष्ण वेताळांकडून अभिनंदन; कर्जमाफीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
कराड/प्रतिनिधी : –
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी स्वागत केले असून, हा निर्णय राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी दिलासादायक आणि आशादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत, हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता अशा अनेक संकटांचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला नवे बळ देणारा आणि शेतीकडे नव्या आशेने पाहण्याची संधी निर्माण करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या कृषी विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करत वेताळ यांनी सांगितले की, शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकरी सक्षम झाला तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी गती मिळेल. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होऊन ते नव्या उत्साहाने शेती करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागाच्या विकासाला सातत्याने प्राधान्य दिल्याचे सांगत त्यांनी सिंचन प्रकल्प, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक विमा योजना, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. कर्जमाफीचा निर्णय या सर्व प्रयत्नांना अधिक बळ देणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत वेताळ यांनी भविष्यातही भाजप किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाशी समन्वय साधत सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारा आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. शेतकरी समृद्ध झाला तर महाराष्ट्रही समृद्ध होईल. शेतकऱ्याला प्रगती आणि उन्नतीच्या मार्गावर नेणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे, असे रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले.



