‘कृष्णा’च्या विजयाबद्दल डॉ. सुरेश भोसले यांचा भाजपकडून सत्कार

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर कारखान्याचे नेतृत्व करणारे डॉ. सुरेश भोसले यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी विशेष सत्कार करण्यात आला. भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला.
यावेळी सौ. धनश्रीताई देशपांडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सिद्धू गेजगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी बोलताना देशपांडे यांनी, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी व्यक्त केलेला विश्वास हा नेतृत्वाच्या कार्यक्षमतेचा आणि सातत्यपूर्ण कामाचा गौरव आहे. हा विश्वास जपत भविष्यातही सभासद व शेतकरी हिताला प्राधान्य देणारे निर्णय घेत कारखान्याची विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहावी, अशा शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ. भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभासदांनी दाखविलेला विश्वास हीच सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत, कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसह शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



