सातारा जिल्हाहोम

कृष्णा आर्थिक परिवाराचा ३,१०९ कोटींचा एकूण व्यवसाय – आ. डॉ. अतुलबाबा भोसले

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८७२ कोटींची वाढ; ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर भक्कम झेप

कराड/प्रतिनिधी : –

ग्रामीण अर्थकारणाला चालना देणाऱ्या आणि जनसामान्यांना भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या कृष्णा आर्थिक परिवाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली प्रगतीची देदीप्यमान परंपरा कायम राखत, ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण ३,१०९ कोटींचा व्यवसाय साध्य केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८७२ कोटींची व्यवसाय वाढ झाली असून, वाढीचे प्रमाण ३८.९८ टक्के राहिले असल्याची माहिती, कृष्णा आर्थिक परिवाराचे प्रमुख तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून, लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे, यासाठी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी सन १९७१ साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेने गेली ५५ वर्षे अव्याहतपणे सेवा देत, सर्वसामान्यांचे हित जपले आहे. याच्याच जोडीला २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि वित्तपेटा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी यांचा मिळून एकत्रित कृष्णा आर्थिक परिवार बनला आहे. या परिवारात नुकतीच दि पाटण अर्बन सहकारी बँकेची भर पडली आहे. या सर्व संस्थांनी मिळून ग्राहकांच्या अखंड विश्वासाच्या बळावर भक्कम झेप घेत, ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण ३,१०९ कोटींचा व्यवसाय साध्य केला आहे.

कृष्णा सहकारी बँकेच्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या एकूण ठेवी ९५१ कोटी ३५ लाख रूपयांच्या असून, ५६१ कोटी ५४ लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १५१२ कोटी ८९ लाख रुपये झाला आहे. बँकेचे एकूण भागभांडवल १२ कोटी ३० लाख आहे; तर १३० कोटी ६३ लाखांचा स्वनिधी आहे. तसेच बँकेला २० कोटींचा ढोबळ नफा प्राप्त झाला आहे. बँकेने सलग १२ व्या वर्षी निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे.

सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेकडे ३१ मार्च २०२६ अखेरच्या एकूण ठेवी ६३९ कोटी २२ लाख रूपयांच्या असून, ४४८ कोटी २५ लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. पतसंस्थेचा एकूण व्यवसाय १,०८७ कोटी ४७ लाख रुपये झाला आहे. पतसंस्थेचे एकूण भागभांडवल २ कोटी २० लाख आहे; तर १४ कोटी ६८ लाखांचा स्वनिधी आहे. तसेच पतसंस्थेला ६ कोटी ६९ लाखांचा ढोबळ नफा प्राप्त झाला असून, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के आहे.

कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडे ३१ मार्च २०२६ अखेरच्या एकूण ठेवी ८४ कोटी २८ लाख रूपयांच्या असून, ५६ कोटी रूपयांचे कर्जवाटप केले आहे. पतसंस्थेचा एकूण व्यवसाय १४० कोटी ३६ लाख रुपये झाला आहे. पतसंस्थेचे एकूण भागभांडवल ४३ लाख असून, १ कोटींचा ढोबळ नफा प्राप्त झाला आहेत. तसेच निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के आहे.

वित्तपेटा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटीकडे ३१ मार्च २०२६ अखेरच्या एकूण ठेवी १९ कोटी ७५ लाख रूपयांच्या असून, १४ कोटी ५१ लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय ३४ कोटी २७ लाख रुपये झाला.

कृष्णा आर्थिक परिवारात नव्यानेच सामील झालेल्या दि पाटण अर्बन सहकारी बँकेच्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या एकूण ठेवी २०९ कोटी ६७ लाख रूपयांच्या असून, १२४ कोटी ७९ लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ३३४ कोटी ४७ लाख रुपये झाला आहे. बँकेचे एकूण भागभांडवल ८ कोटी २२ लाख आहे; तर २६ कोटी ४६ लाखांचा स्वनिधी आहे. तसेच बँकेला २ कोटी ७६ लाखांचा ढोबळ नफा प्राप्त झाला आहे.

कृष्णा सहकारी बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक मोबाईल बँकींग, यूपीआय सेवेच्या माध्यमातून गुगल पे, फोन पे द्वारे सेवा, एटीएम सुविधा, ई-कॉमर्स, आर.टी.जी.एस. / एन.ई.एफ.टी., एन.ए.सी.एच्. यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. तसेच बँकेने सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या ४ जिल्ह्यात २७ शाखा व १ विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देत आहे. बँकींग क्षेत्रात तंत्रज्ञानाचे वाढते महत्व लक्षात घेऊन, कृष्णा आर्थिक परिवारातील सर्वच संस्थांमध्ये येत्या काळात डिजीटल सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे चेअरमन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगून, संस्थेच्या ठेव व कर्जयोजनांचा तसेच अन्य सुविधांचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देत सेवा अधिक सुलभ करणार – आ.डॉ. अतुलबाबा भोसले

कृष्णा आर्थिक परिवाराची ही प्रगती आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ग्राहकांचा अढळ विश्वास हाच आमच्या वाटचालीचा खरा आधार आहे. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी घातलेल्या सहकाराच्या मजबूत पायावर आम्ही आजही ठामपणे उभे आहोत. डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्थांनी सातत्याने पारदर्शकता, विश्वासार्हता आणि शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार यावर भर दिला आहे. त्याचेच फलित म्हणून आज आम्ही नफ्यात वाढ आणि व्यवसाय विस्तार साध्य करत आहोत. या यशामध्ये सर्व संस्थांचे संचालक व व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांचे योगदान महत्वपूर्ण आहे. येत्या काळातही आम्ही ग्राहककेंद्रित धोरण कायम ठेवत, तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून सेवा अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित करण्यावर भर देणार आहोत, असे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्पष्ट केले.

Related Articles