सातारा जिल्हाहोम

कराडचा जनावरे बाजार गुरुवारी भरणार

मतदान पुढे ढकलल्याने बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय

कराड/प्रतिनिधी : – 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेला कराड येथील जनावरे बाजार गुरुवार दि. ५ रोजी नियमितपणे भरणार आहे. निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने कराड शेती उत्पन्न बाजार समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी दिली.

कराड व परिसरातील शेतकरी, पशुपालक, व्यापारी यांच्यासाठी जनावरे बाजार हा आर्थिक व्यवहारांचा महत्त्वाचा आधार आहे.विशेषतः शेतीपूरक व्यवसाय म्हणून जनावरांच्या खरेदी-विक्रीवर अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे गणित अवलंबून आहे. निवडणूक आचारसंहिता व मतदान प्रक्रियेच्या कारणामुळे बाजार बंद राहिल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने हा संभ्रम दूर झाला असून बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय शेतकरी हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.

उपसभापती नितीन ढापरे यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेमुळे कोणतीही गैरसोय होऊ नये,तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टळावे, यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून जनावरे बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सभापती सतीश इंगवले यांनी स्पष्ट केले की, बाजारात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असून व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावे.

बाजार भरताना प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार दि. ५ रोजी कराडचा जनावरे बाजार नेहमीप्रमाणे भरणार असून शेतकरी व व्यापाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहनही बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles