एआय तंत्रज्ञानामुळे उसाचे एकरी उत्पादन वाढू शकते – प्रतिकदादा पाटील

ईश्वरपूर/प्रतिनिधी : –
एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस उत्पादनात क्रांती घडणार असल्याने आपल्या साखर कारखान्याने राज्यात सर्वप्रथम पुढाकार घेत आपल्या कार्यक्षेत्रात १५ हवामान केंद्रे उभा केली आहेत. आता आपल्या शेतकऱ्यांना पिकाला पाणी, खते कधी द्यायची, पिकातील रोगराईबरोबर हवामान, तापमान, एवढेच नव्हे तर पाऊस कधी, किती पडणार, ही अद्यावत माहिती मोबाईलवर मिळणार आहे. यातून निश्चितपणे उसाचे एकरी उत्पादन वाढू शकते, असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला.
बोरगाव (ता.वाळवा) येथे प्रगतशील शेतकरी बाबासाहेब सलगर यांच्या शेतात एआय तंत्रज्ञान अंतर्गत उभारलेल्या हवामान केंद्राच्या पहाणी प्रसंगी ते बोलत होते. बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदिपकुमार पाटील,संचालक शैलेश पाटील, राजकुमार कांबळे, कृष्णेचे अविनाश खरात, सचिव डी.एम.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
प्रतिकदादा पाटील म्हणाले, आपण माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा करीत आहोत. ४०२ शेतकरी आपल्या शेतात ए. आय. तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती करणार आहेत. आपण शेतकऱ्यांना तोषिस न देता कार्यक्षेत्रात हवामान केंद्रे उभा केली आहेत. त्याचा लाभ त्या-त्या परिसरातील पाच किलोमीटर अंतरा तील शेतकऱ्यांना होणार आहे. आपला साखर कारखाना,बारामती कृषी विज्ञान केंद्र, व्हीएसआय मांजरी बु:आणि संबंधित शेतकरी एकमेकांच्या साथीने या प्रकल्पात वाटचाल करणार आहोत. सध्या आपण ठिबक सिंचन व रोप लागण केलेल्या शेतात एआय तंत्रज्ञानाचा वापर करतोय. मात्र भविष्यात पाट पाण्याचा वापर करणाऱ्या शेतातही या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न आहे.
यावेळी सहाय्य्क कृषी संशोधन अधिकारी विवेक पुजारी यांनी शेतकऱ्यांना ए.आय.तंत्रज्ञाना बद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी अभिजित पाटील,उदय शिंदे,जेष्ठ कार्यकर्ते मारुती पाटील,ए.पी.पाटील,पै.विकास पाटील, पै. विनायक पाटील, देवराज देशमुख, धैर्यशील प्रकाश पाटील, लालासाहेब वाटेगावकर, शहाजी शिंदे, बाबासाहेब सलगर,डी.आर.सलगर, टी.आर. सलगर,प्रकाश वाटेगावकर,प्रमोद सलगर, प्रसाद सलगर,अभंग सलगर,हणमंत राजमाने, संग्राम गावडे यांच्यासह गावातील पदाधिकारी, परिसरातील शेतकरी व सलगर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. प्रारंभी अशोक सलगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी उपसरपंच राजेंद्र वाटेगावकर यांनी आभार मानले.


