कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील माजगाव (ता. सातारा) येथे उरमोडी नदीवरील सुमारे ३५ वर्षे जुन्या फरशी पुलाच्या जागी नव्या, भक्कम व उंच पुलाची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाली आहे.
हायवेपासून माजगावला जोडणारा उरमोडी नदीवरील हा फरशी पूल अत्यंत अरुंद व कमी उंचीचा असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरत होता. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेकदा वाहतूक पूर्णतः बंद ठेवावी लागत होती. त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या ठिकाणी उंच व रुंद पूल उभारण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.
ग्रामस्थांची ही दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन आमदार मनोज घोरपडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड योजनेतून माजगाव येथील नवीन पुलासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या पुलाच्या उभारणीमुळे आंबेवाडी, मत्त्यापूर, खोजेवाडी आदी गावांना शेतीमाल वाहतुकीस मोठी मदत होणार असून परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. यासोबतच काशीळ ते वेनेगाव कोपर्डे नदीच्या संगमावरील पुलासाठी नाबार्डमधून २४ कोटी रुपये तसेच सीआरआयएफमधून २० कोटी रुपयांचे टेंडर मंजूर झाले असून, या पुलासाठी एकूण ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दर्जेदार व टिकाऊ पुलाची उभारणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन पुलाच्या उभारणीमुळे माजगाव परिसरातील दळणवळणाला मोठी गती मिळणार असून, त्याचा थेट लाभ शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीबद्दल माजगाव व परिसरातील ग्रामस्थांनी महायुती सरकार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच आमदार मनोज घोरपडे यांचे विशेष आभार मानले आहेत.



