उंडाळेत विलासकाका उंडाळकर व स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील पुण्यतिथी निमित्त ३ व ४ जानेवारीला संयुक्त शेतकरी मेळावा व पुण्यतिथी सोहळा
कराड/प्रतिनिधी : –
लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील – उंडाळकर आणि स्वातंत्र्यसैनिक कै. शामराव पाटील अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त उंडाळे, ता. कराड येथे शनिवार व रविवार, दिनांक ३ व ४ जानेवारी रोजी संयुक्त शेतकरी मेळावा व पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांद्वारे शेतकरी, सभासद आणि कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शनपर व प्रेरणादायी उपक्रमांची सांगड घालण्यात आली असल्याची माहिती रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी दिली.
शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी स्वातंत्र्यसैनिक कै. शामराव पाटील अण्णा यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त दुपारी २ वाजता उंडाळे येथे शेतकरी व सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित ऊस परिसंवाद’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या परिसंवादासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे ऊस विशेषतज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, अथणी शुगर लिमिटेडचे चेअरमन व माजी मंत्री श्रीमंत पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले आणि ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, रयत सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
तर रविवार, दि. ४ जानेवारी रोजी माजी मंत्री व लोकनेते स्व. विलासकाका पाटील – उंडाळकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व खासदार नितीनकाका पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदिर, उंडाळे येथे होणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना शेतकरी, सभासद व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. पाटील आणि शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांनी केले आहे.



