शेतीतील बदल स्वीकारून शेतकऱ्यांनी स्वतःला बदलावे – शहाजीराव क्षिरसागर
स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी प्रयोगशील शेतकऱ्यांचा ‘शेतीनिष्ठ पुरस्काराने’ गौरव

कराड/प्रतिनिधी : –
पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणे आज काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये होत असलेले तांत्रिक, आर्थिक व बाजारपेठेतील बदल शेतकऱ्यांनी स्वीकारून स्वतःमध्ये बदल घडवून आणला, तरच शेती अधिक समृद्ध होईल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असे प्रतिपादन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षिरसागर यांनी केले.
शेती उत्पन्न बाजार समिती कराड, राज्य शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने बैल बाजार तळावर आयोजित विसाव्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या समारोप समारंभ व शेतीनिष्ठ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, युवा नेते आदिराज पाटील – उंडाळकर, आत्मा प्रकल्पाचे संचालक अजय शेंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, सहकार उपनिबंधक अपर्णा यादव, बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, ज्येष्ठ संचालक प्रकाश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, संचालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षिरसागर म्हणाले, शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून खतांची अचूक मात्रा समजते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो. खर्च कमी करून अधिक उत्पादन घेणे, हा आधुनिक शेतीचा मूलमंत्र असून तो शेतकऱ्यांनी आत्मसात केला पाहिजे. कराडचे कृषी प्रदर्शन संपूर्ण राज्याला दिशा देणारे असून, स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांनी घातलेला हा पाया आज उदयसिंहदादा उंडाळकर सक्षमपणे पुढे नेत आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाला साजेसे कार्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, शेतीमध्ये नफा-तोटा होऊ शकतो, मात्र भांडवल सुरक्षित राहते. अन्य कोणत्याही व्यवसायात अशी स्थिती नसते. त्यामुळे सहकारी संस्था व जिल्हा बँका शून्य टक्के व्याजदराने शेती कर्ज उपलब्ध करून देतात. शासन धोरणे व तंत्रज्ञान देते, मात्र प्रत्यक्ष काम शेतकऱ्यांनाच करावे लागते. तरुणांनी पारंपारिक शेतीला आधुनिक उद्योगाचे स्वरूप देत खर्च नियंत्रणात ठेवून शेतीचे अर्थकारण जपले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आत्मा प्रकल्पाचे संचालक अजय शेंडे यांनीही आधुनिक शेती, तंत्रज्ञान व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
या समारंभात मान्यवरांच्या हस्ते शेतीनिष्ठ पुरस्कार, कृषी विभागाकडील पिकनिहाय उत्पादकता पुरस्कार, शेळी-मेंढी पालन, ऊस स्पर्धा व अन्य विविध स्पर्धांमधील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गुळाची ढेप देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांच्यासह संचालकांनी स्वागत केले, तर उपसभापती नितीन ढापरे यांनी आभार मानले.
सन्मानित शेतकरी – कराड दक्षिण विभाग : लालासो आनंदराव पवार (गोंदी) – जुकेनी, चेरी टोमॅटो, भगवान आनंदा शेवाळे (घोगाव) – बहुपीक, मिश्र शेती, प्रशांत हिंदुराव गरुड (येणके) – सेंद्रिय केळी, नाथा रामचंद्र बोंद्रे (कासार शिरंबे) – दुग्ध व्यवसाय, संतोष जयप्रकाश गुरव (टेंभू) – भाजीपाला, अनिल कृष्णा जमाले (मुंढे) – सेंद्रिय शेती.
कराड उत्तर विभाग : लालासाहेब वसंतराव गिरीगोसावी (मरळी) – आले-फुले, पंढरीनाथ मोहन पाटील (तांबवे) – सेंद्रिय भाजीपाला, दिनकर रघुनाथ पाटील (निगडी) – फळबागा, अर्जुन राजाराम भोसले (गोवारे) – ऊस, हणमंत जिजाबा पवार (वडोली निळेश्वर) – पेरू-झेंडू, बाळासाहेब लक्ष्मण साळुंखे (वराडे) – सेंद्रिय शेती.
विशेष सत्कार : शहाजी पांडुरंग पाटील (सुपने) – गुळ उत्पादन, संतोष शंकर पाटील (काले) – भाजीपाला, वैशाली विकास थोरात (कार्वे) – धानाई महिला ग्राम संघ
जिल्हास्तरीय उत्पादकता पुरस्कार (कृषी विभाग) : हरभरा – सुनील भोसले, चांगदेव मोरे, दत्तात्रय मोहिते, गहू – सत्यवान शिंदे, विलास जगताप, धनाजी जाधव व रब्बी ज्वारी – धनंजय पवार, एकनाथ जाधव, विनायक धुमाळ.



