सातारा जिल्हाहोम

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव करा – प्रा. मच्छिंद्र सकटे

सातारच्या मराठी साहित्य संमेलनात ठराव न झाल्यास तीव्र संघर्षाचा इशारा 

कराड/प्रतिनिधी : –

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जिल्ह्याचे सुपुत्र, जागतिक कीर्तीचे लोकशाहीर, लेखक सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची जाणीवपूर्वक उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप करत, या संमेलनात अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी दिला.

याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, राम दाभाडे, रमेश सातपुते, प्रा. पै. अमोल साठे, जयवंत सकटे, राहुल वायदंडे, सोमनाथ महापुरे, देवेंद्र कांबळे, कृष्णत तुपे, निलेश तडाखे, सोमनाथ बगाडे, अमोल वायदंडे आदी उपस्थित होते.

प्रा. सकटे म्हणाले, सातारा शहरात यापूर्वी पाच, तर कराड येथे दोन अशी एकूण सात मराठी साहित्य संमेलने जिल्ह्यात झाली आहेत. मात्र या संमेलनांमध्ये सातारा – सांगली जिल्ह्याला आणि एकूणच मराठी भाषेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या अनेक साहित्यिकांचा अपेक्षित सन्मान झालेला नाही. विशेषतः मूळ सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्यावर संपूर्ण साहित्य संमेलनात एकही चर्चासत्र ठेवण्यात आलेले नाही, तसेच स्वागत कमान किंवा विचारमंचालाही त्यांचे नाव देण्यात आलेले नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे हे मूळचे तत्कालीन दक्षिण सातारा (सध्याचा सांगली जिल्हा) येथील वाटेगाव गावचे असून, त्यांनी आपल्या साहित्याद्वारे उपेक्षित, शोषित समाजाचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवला. अशा महान साहित्यिकाचा सातारच्या साहित्य संमेलनात सन्मान न होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असून, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील आहेत. विश्वास पाटील यांनी अण्णाभाऊंची चरित्रात्मक कादंबरी लिहिली असून, त्यांचे दुःख, संघर्ष आणि साहित्यिक महत्त्व त्यांना अधिक चांगले ज्ञात आहे. त्यामुळे त्यांनीच अण्णाभाऊंच्या उचित सन्मानाचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रा. सकटे यांनी व्यक्त केली. तसेच या मागणीसंदर्भात संमेलनाध्यक्षांशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे सांगत, जर या साहित्य संमेलनात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर झाला नाही, तर समारोपाच्या कार्यक्रमात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

Related Articles