कृष्णा कारखान्यात ५ जानेवारीपासून राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

कराड/प्रतिनिधी : –
सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ५ ते ७ जानेवारी दरम्यान खुल्या गटातील भव्य राज्यस्तरीय निमंत्रित पुरूष कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
कराड तालुका साखर कामगार युनियन व गणेश शिवोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वित्तीय, तृत्तीय, चतृर्थ क्रमांकाच्या संघाला अनुक्रमे ५० हजार रुपये, ४० हजार रुपये, ३० हजार रुपये आणि २० हजार व स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याचबरोबर अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी प्रत्येकी २ हजार १११ रुपये व स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) चषक पारितोषिक देण्यात येणार आहे.
या स्पर्धा सहकारमहर्षी जयवंतराव भोसले क्रिडानगरी येथे खेळविल्या जाणार असून, निमंत्रित संघांनी प्रा.डॉ. संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, प्रा. अमोल मंडले, राहुल निकम, आबासो यादव, प्रा. महेश कुंभार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम.के. कापूरकर व गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.



