स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ !
'उमेद'च्या महिला सक्षमीकरणाला शासकीय यंत्रणांसह कराड बाजार समितीचे बळ

कराड/प्रतिनिधी : –
स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात यंदाच्या कराड तालुका पंचायत समिती अंतर्गत उमेद अभियानात कार्यरत असलेल्या तब्बल ३५ स्वयंसहायता समूहांना आपले उत्पादने विकण्याची संधी कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीसह शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. उमेद बचत गटाच्या कराड तालुक्यातील स्थानिक हजारो महिलांनी महिलांनी एकत्र येत तयार केलेल्या विविध उत्पादनास प्रदर्शनात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने उमेद अभियानाच्या महिला सक्षमीकरण चळवळीला राज्य शासन व जिल्हा परिषदेसह थेट कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे भक्कम पाठबळ मिळाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये उमेद अभियानाचे सुमारे २१ हजार महिला स्वयंसहाय्यता बचत गट कार्यरत आहेत. यापैकी एकट्या कराड तालुक्यामध्ये ४ हजार समूहांच्या माध्यमातून सुमारे ४१ हजार कुटुंबं उमेद अभियानाशी जोडली गेली आहेत. गेल्या सात वर्षांपासून अभियानातील महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांमध्ये कार्यरत झाल्या आहेत. या महिला सक्षमीकरण चळवळीस भक्कम करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सातत्याने सुरू असतात.
महिलांच्या या स्थानिक पातळीवरील आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला भक्कम पाठबळ देण्यासाठी कराड शेती उत्पन्न बाजार समितीने स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनामध्ये उमेद अभियानांतर्गत कार्यरत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळवून देत , ३५ मोफत स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून अभियानातील कराड तालुक्यातील स्थानिक महिलांनी उत्पादन केलेल्या उत्तम प्रतीच्या आणि दर्जाचे व्यावसायिक मापदंड पूर्ण करणाऱ्या उत्पादनांना योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. पापड, सांडगे, लोणची, शेवया, हळद, अशा पारंपारिक उत्पादनांबरोबरच सेंद्रिय गुळकाकवी, पौष्टिक बिस्किटे, परफ्यूम, नाचणी लाडू, बटाटा व केळी वेफर्स, विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू उमेदच्या या स्टॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
महिलांच्या या स्टॉलला प्रदर्शनास भेट देणाऱ्या खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामुळे महिलांकडून जिल्हा परिषद व शासनासह बाजार समितीचे मार्गदर्शक व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील , कराड बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व त्यांच्या मार्गदर्शकांना मनोमन धन्यवाद दिले आहेत.
प्रदर्शनातील संयोजनासाठी कराड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार, तालुका व्यवस्थापक श्रीकांत कुंभारदरे, प्रभाग समन्वयक धनंजय पाटील, सुशांत तोडकर, करण जाधव, चिन्मय वराडकर आदींसह सर्व तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.



