ऊस, केळी, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धांतून शेतकऱ्यांना प्रोत्साहन

कराड/प्रतिनिधी : –
येथील स्वातंत्र्यसेनानी शामराव पाटील फळे, फुले व भाजीपाला मार्केटमधील बैल बाजार तळावर दि. २६ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव २०२५ अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दर्जेदार ऊस, केळी, फुले, फळे तसेच फळभाज्या व पालेभाज्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमुळे शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण शेती उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळणार असून उत्पादनातील गुणवत्ता वाढीस चालना मिळणार आहे.
या स्पर्धांमध्ये दि. २६ डिसेंबर रोजी सर्व जातींचा वाड्यास मुळासह अखंड ऊस (५ उसांची मोळी), दि. २७ डिसेंबर रोजी सर्व प्रकारचे केळीघड, दि. २८ डिसेंबर रोजी गुलाब, जरबेरा, कार्नेशन, निशिगंध, ग्लॅडिओलस, झेंडू आदी सर्व प्रकारची फुले, दि. २९ डिसेंबर रोजी आंबा, द्राक्षे, डाळिंब, सिताफळ, चिकू, आवळा, पपई, पेरू आदी सर्व प्रकारची फळे, तर दि. ३० डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या या गटात स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५,००१ रुपये, ३,००१ रुपये व २,००१ रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दि. २६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता व उर्वरित दिवशी सकाळी १० वाजता प्रदर्शनस्थळी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या स्टॉलवर आपले नमुने सादर करावेत. यासाठी नावनोंदणी सुरू असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे.
स्पर्धेसाठी आणलेला नमुना आकर्षक पॅकिंगमध्ये असावा व तो किमान १ किलो वजनाचा किंवा नजरेत भरेल इतक्या संख्येचा असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याचा एकच नमुना स्वीकारला जाणार असून, स्पर्धेसाठी दिलेला नमुना परत केला जाणार नाही. बक्षिसांबाबत संबंधित समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी कराड पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी श्री. संतोष किर्वे (दूरध्वनी ०२१६४-२२२२२१, मोबा. ८२०८२१४१७८), तसेच कराड येथील महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती क्षमादेवी माळी (दूरध्वनी ०२१६४-२२३२३७, मोबा. ९५१८५४४६७६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



