सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये २७ डिसेंबरला पश्चिम महाराष्ट्र स्तरीय चौथी सहकार परिषद – अशोकराव थोरात 

कराड/प्रतिनिधी : –

सहकार क्षेत्राची वास्तव परिस्थिती, अधोगतीची कारणे आणि भविष्यातील दिशा यावर परखड विचारमंथन करून सहकार चळवळीला नवी दिशा देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र स्तरीय चौथी सहकार परिषद २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मळाई ग्रुप मलकापूर-कराडचे प्रमुख, शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही परिषद शनिवार, दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शताब्दी सभागृहात होणार आहे. मळाई ग्रुप मलकापूर – कराड आणि कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सलग चौथ्या वर्षी ही परिषद आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अर्थशास्त्र राज्य विचारमंचचे समन्वयक प्रा. सतीश जंगम यांची उपस्थिती होती.

सहकार क्षेत्र आणि त्याच्या सद्यस्थिती बाबत बोलताना थोरात म्हणाले, भारतामध्ये शेतकरी व ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी १९०४ मध्ये सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रात १९६० च्या सहकार कायद्यामुळे शेती, उद्योग व रोजगार क्षेत्रात मोठी प्रगती झाली. मात्र गेल्या दोन-तीन दशकांत खाजगीकरण, राजकीय हस्तक्षेप, घराणेशाही, गैरव्यवहार व भ्रष्टाचार यामुळे सहकार क्षेत्र मोठ्या संकटात सापडले आहे. ९७ व्या घटना दुरुस्ती नंतर व केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते सुरू केल्यानंतर सहकार चळवळीचे भवितव्य काय असेल, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्राचे वस्तुनिष्ठ विश्लेषण व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या नव्या सहकार धोरणांचा सहकारी चळवळीवरील परिणाम अभ्यासणे, सहकार क्षेत्राची सद्यस्थिती, समस्या व आव्हानांवर चर्चा करणे, सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, शिक्षण व प्रशिक्षण यावर विचारमंथन, सहकार वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे हा या परिषदेचे प्रमुख उद्देश आहे. सहकार क्षेत्रातील सभासद व पदाधिकारी, सहकार क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेले विद्यार्थी व युवक, सहकार आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, सहकार खात्यातील अधिकारी, तसेच समाजातील सर्व घटकांसाठी ही परिषद खुली असल्याचे त्यांनी सांगितले.

परिषदेचे उद्घाटन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी कराड अर्बन बँकेचे अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी असतील. यावेळी मळाई ग्रुपचे प्रमुख अशोकराव थोरात, कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंचचे अध्यक्ष प्रा.डॉ. शरद शेटे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक उपनिबंधक अपर्णा यादव आणि अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या परिषदेच्या पहिल्या सत्रात सांगलीच्या श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यायाचे माजी अर्थाशात्र विभागप्रमुख सुभाष दगडे हे ‘नवीन सहकार धोरण’ या विषयावर (दुपारी १ ते २) मार्गदर्शन करणार आहेत. तर द्वितीय सत्रात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल वावरे हे ‘महाराष्ट्रातील सहकाराची सद्यस्थिती व उपाय’ या विषयावर (दुपारी २ ते ३), तर तृतीय सत्रात सिंदखेडराजा येथील सहाय्यक निबंधक बाबुराव शेळके हे ‘सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण’ या विषयावर (दुपारी ३ ते ३.३०) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर समारोप सत्रात (दुपारी ३.३० ते ४) अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या सत्रास मळाई पतसंस्थेचे चेअरमन अजित थोरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, यावेळी बारावी बोर्ड परीक्षेत सहकार विषयात ९५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा व त्यांच्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ही परिषद सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्ती रोखण्यासाठी प्रबोधन, जागृती व सक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी महत्त्वाची ठरणार असून, नोंदणी व सहभाग पूर्णतः विनामूल्य आहे. तरी सहकार क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, अभ्यासक व कार्यकर्त्यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अशोकराव थोरात यांनी यावेळी केले आहे.

शिक्षण पद्धती आणि प्रत्यक्षातील सहकार यात मोठा फरक आहे, यासाठी विद्यार्थ्यांना ही परिषद मार्गदर्शक ठरणार आहे. घोटाळ्यांमुळे सहकार क्षेत्र बदनाम होत असताना, याबाबत सहकार क्षेत्र काय करते? सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण व्यवस्थित होत नाही, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. हल्ली सहकार क्षेत्राकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. यामुळे सहकार चळवळ मोडीत निघाल्यास पुन्हा शेतकरी, सर्वसामान्य नागरिक सावकाराच्या तावडीत सापडेल. त्यामुळे सहकाराबाबत जाणीवजागृती करण्यासाठी अशोकराव थोरात यांनी उभारलेले कार्य अत्यंत मोलाचे असल्याचे मत प्रा. सतीश जंगम यांनी व्यक्त केले.

Related Articles