काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्यावर कार्यकर्ते ठाम
सुपने-तांबवे जि.प. गट काँग्रेसने ताकदीने लढावा; पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा आग्रह

कराड/प्रतिनिधी : –
शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचे प्रामाणिक पालन करणारा पक्ष काँग्रेसच असून, हाताचं चिन्ह म्हणजेच काँग्रेसचा विचार आहे. हा विचार जपण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सुपने येथे आयोजित सुपने – तांबवे जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्यासह इंद्रजीत चव्हाण, बलराज पाटील, जगदीश पाटील, अशोक पाटील, सतीश पानुगडे, सुहास पाटील, प्रदीपराव थोरात, बजरंग पाटील, दादाराम जाधव, विद्याधर पाटील, विजय देवकर, सौ. अक्षदा पवार, सौ. पूजा पवार, हिंदुराव पाटील, निवृत्ती माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी निवडणुका काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हाताच्या चिन्हावरच लढवाव्यात, या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या भोंगळ व निष्काळजी कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी झाली असून, निवडणूक नियोजनात गंभीर त्रुटी आढळत असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेलाच धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त झाली.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर टीका करताना चव्हाण म्हणाले, सरकारच्या अपयशामुळे तब्बल ८० टक्के जनतेला मोफत धान्य द्यावे लागत आहे. हे नाकर्तेपणाचे द्योतक असून, मोदी सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात; प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही.
भाजपाकडे स्वतःचे असे काहीच नसून, देशातील संस्था, यंत्रणा व नेतृत्व काँग्रेसनेच घडवले आहे. काँग्रेसने उभारलेल्या शासकीय संस्थांचे खाजगीकरण करण्याचा घाट सध्याचे सरकार घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच दबाव व ब्लॅकमेलच्या माध्यमातून काँग्रेसने घडवलेले नेते भाजपात नेले गेले; मात्र भाजपाने स्वतः एकही मोठा नेता घडवलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेस हा केवळ पक्ष नसून, एक विचार आहे. हा विचार टिकवण्यासाठी वाचनसंस्कृती वाढवावी, व्हॉट्सॲपवरील अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता पुस्तके व विश्वसनीय संदर्भांतून इतिहास समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, सुपने – तांबवे जिल्हा परिषद गट काँग्रेसने पूर्ण ताकदीने, संघटितपणे निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर केली. काँग्रेसची विचारधारा व संघटनशक्ती यांच्या बळावरच यश संपादन करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



