राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील

कराड/प्रतिनिधी : –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सातारा जिल्हा संघटनाला नवी दिशा देत माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार बुधवारी ही नियुक्ती जाहीर झाली. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देत पाटील यांचे अभिनंदन केले.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले आमदार, माजी सहकार-पणन मंत्री, तसेच सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्या संघटनशील कार्यतत्परतेची, जनसंपर्क क्षमतेची आणि पक्षविस्तारासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने सातारा जिल्ह्यातील पक्षविस्ताराला नवी उभारी देण्यासाठी आपण योग्य व्यक्ती आहात, असा विश्वासही व्यक्त केला आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा जिल्ह्यातील पक्षबांधणीला निश्चितच मोठा फायदा होईल, असेही नेतृत्वाने नमूद केले आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही नियुक्ती जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी उर्जादायी ठरली आहे. पाटील यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सातारा जिल्ह्यात नवसंजीवनी मिळेल, असा ठाम विश्वास पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.



