“कराडच्या सर्वांगीण विकासाची गुढी उंचावणार – एकनाथ शिंदे”
कराड शहरासाठी मोठी घोषणा; शिंदेंचा विकासभरारी दावा

कराड / प्रतिनिधी : –
कराड ही महाराष्ट्राच्या विकासाची यज्ञभूमी आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी येथूनच विकासाची गुढी उभारली. त्या वारशाला नवी उंची देण्यासाठीच यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीत एकजूट केली आहे. कराडच्या विकासाचा झेंडा, हाच या आघाडीचा अजेंडा आहे. कराडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कराड पालिकेवर आघाडीचा झेंडा फडकवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जयवंतराव शेलार, जयंतकाका पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, नगरसेवक हणमंत पवार, फारूक पटवेकर, राजेंद्र माने, बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, घनश्याम पेंढारकर, नितीन वास्के, सुलोचना पवार, नाना पाटील, अल्ताफ शिकलगार, विद्यारानी साळुंखे, नंदकुमार बटाणे, गीतांजली थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ही आघाडी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करेल. कराडची वाट लावणाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना मार्ग दाखवा. महिला कल्याणाच्या विविध योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे आश्वासन देत त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे स्पष्ट केले. लोकाभिमुख धोरणांमुळे राज्यात ३३२ आमदार निवडून आल्याचे त्यांनी नमूद केले.
कराडच्या विकासासाठी ३२५ कोटी रूपयांचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजनेसाठी ३६४ कोटी, ड्रेनेजसाठी ९६ कोटी, रस्त्यांसाठी १२८ कोटी या मोठ्या प्रकल्पांवर भर देतानाच आणखी निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. कराड विमानतळ विस्तारीकरण, ऑडिओ हॉल, शॉपिंग सेंटर, आरोग्य–शिक्षण सुविधा, पाणी व ड्रेनेज योजना अशा प्रकल्पांना गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्रसिंह यादव यांना कोणीही रोखू शकत नाही. विकासाचा झेंडा नगरपालिकेवर निश्चित फडकेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रात अनेक नेत्यांनी महत्त्वाची कामे केली. पी. डी. पाटील साहेबांच्या दूरदृष्टीतून अनेक सुस्थितीतील योजना उभ्या राहिल्या. आता नागरिकांच्या गरजांचा आवाज ऐकून दोन्ही आघाड्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याचे व ड्रेनेजचे जाळे अधिक विस्तारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, “नारळ आणि छत्री या चिन्हांसमोरील बटण दाबा; कराडच्या विकासाचा निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही नागरिकांच्या मनातील कराड उभे करू. सहकार मंत्री पदावर असताना शहरातील अनेक प्रश्नांना न्याय दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी, २४x७ पाणीपुरवठा योजना, सोलर बचत प्रकल्प, वाढीव भागातील ड्रेनेज, १४ नवी अभ्यासिका, फिश मार्केट, पार्किंग समस्येवरील उपाय, नवी कृष्णा घाटांची निर्मिती, संत सखू मंदिराला पर्यटन दर्जा, पालिकेच्या शाळांना अत्याधुनिक सुविधा यांसारख्या योजनांची घोषणा केली.
ते म्हणाले, पुढील ५० वर्षांचा विकासाचा पाया आता रचायचा आहे. यशवंत व लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना संधी द्या; पाच वर्षांत कराडच्या विकासात कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही.



