कराडचे कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन लांबणीवर
निवडणूक प्रक्रियेचा मोठा परिणाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत निर्णय

कराड/प्रतिनिधी : –
येथील कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 24 ते 28 नोव्हेंबरदरम्यान भरविण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन व कृषी महोत्सव यावर्षी पुढे ढकलण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीने दिली.
शुक्रवारी (दि. 21) सातारा येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सद्य:स्थितीत नगरपालिका निवडणुका सुरू असून, त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याचीही शक्यता असल्याने शासकीय यंत्रणा पूर्णपणे निवडणूक कामात गुंतणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रदर्शनाचे आयोजन पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील बैठकीत प्रदर्शनाची नवीन तारीख घोषित करण्यात येणार आहे.
कराडच्या या प्रदर्शनास राज्यभरातून शिवाय शेजारील राज्यांतूनही लाखो शेतकरी मोठा प्रतिसाद देतात. आधुनिक शेती तंत्रज्ञान, नव्या यंत्रसामग्रीची माहिती यावेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. कृषी विभाग, पशुसंवर्धन, महसूल, सहकार यांसह अनेक शासकीय विभाग या प्रदर्शनात सहभाग नोंदवून विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात.
मात्र यावर्षी निवडणूक प्रक्रियेतील व्यस्ततेमुळे सर्व शासकीय विभागांची मनुष्यबळ उपलब्धता मर्यादित राहणार असल्याने प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदर्शनाच्या नव्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल. शेतकरी बांधव व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कराड शेती उत्पन्न बाजार समितीने केले आहे.



