सातारा जिल्हाहोम

कराड नगरपालिका ठेकेदारमुक्त करणार – झाकीर पठाण

शिवतीर्थावरून काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ

कराड/प्रतिनिधी : –

कराड नगरपालिकेत चार-पाच ठेकेदारांनी अक्षरशः मक्तेदारी निर्माण केली आहे. या ठेकेदारी व्यवस्थेला आणि भ्रष्टाचाराला पूर्णविराम देण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. ही भांडवलशाहीविरुद्ध सर्वसामान्यांच्या हक्काची लढाई आहे. यात आम्ही यश मिळवू, असा विश्वास काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांनी व्यक्त केला.

शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. अमित जाधव, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, पक्षाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पठाण म्हणाले, ठेकेदारमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका हा आमचा मुख्य अजेंडा आहे. संविधानाचा आधार घेऊन पारदर्शक, जबाबदार आणि जनहितवादी कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न राहील. संविधानाच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून नगरपालिकेचा कारभार चालवण्याची आमची धडपड आहे.

विरोधी उमेदवाराचे नाव न घेता टीका करताना ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी काही लोकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा राजकीय वापर केला, आजही तेच डाव पुन्हा खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाबांचे आशीर्वाद घेत खोट्या गोष्टी पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग त्यांनी चालवला आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या ‘हात’ चिन्हाव्यतिरिक्त इतर कुणाच्याही प्रचाराला जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, कराड शहराने देशभरात स्वच्छ आणि सुंदर नगरपालिकेची ओळख निर्माण केली आहे. या परंपरेला पुढे नेत आणखी स्वच्छ, पारदर्शक नगरपालिका घडविण्याचा आमचा मानस आहे. सर्वसामान्य जनता आमच्या सोबत उभी असून, या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल.

Related Articles