सातारा जिल्हाहोम

कराडचे विकासासाठी यशवंत व लोकशाही आघाडी एकत्र – पालकमंत्री शंभूराज देसाई

शिवतीर्थावरून प्रचाराचा शुभारंभ

कराड/प्रतिनिधी : –

कराड शहरातील प्रलंबित प्रश्नांची उकल करून सर्वांगीण विकास साधण्यासाठी यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीने एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कराडकरांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, दोन्ही आघाड्यांना प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

येथील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कराड शहराचा विकास हा आमचा एकमेव अजेंडा आहे. यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. याप्रसंगी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव, तसेच दोन्ही आघाड्यांचे उमेदवार आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या रणजीत पाटील यांच्याबाबत बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते माघार घेतील, अशी अपेक्षा होती. मी आणि जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार सतत त्यांच्या संपर्कात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मानणारे ते असल्याने पक्षाने त्यांना भरपूर सहकार्य दिले आहे. मात्र पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती करूनही त्यांनी माघार घेतली नाही. याबाबतचा अहवाल मध्यवर्ती कार्यालयाला पाठवण्यात येणार असून, त्यावर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील.

शिवसेनेचे चिन्ह न वापरता स्थानिक आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला आहे. कराडच्या विकासासाठी स्थानिक आघाडीचा पर्याय निवडला असून, राजेंद्रसिंह यादव हे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. कराडच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड शहराच्या विकासासाठी लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत आता एकत्रित आघाड्यांचा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जात असून, नागरिक त्यास उत्स्फूर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles