विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार – बाळासाहेब पाटील

कराड/प्रतिनिधी : –
कराड शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत, त्यादृष्टीने नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीने तीस जागांवर उमेदवार उतरवले आहेत. काही कारणांनी आघाडीत कॉंग्रेस पक्षाचा समावेश होऊ शकला नाही, मात्र त्यादृष्टीने शेवटपर्यंत आपण प्रयत्न केले. आता समविचारी लोकांची साथ घेऊन निवडणुकीत यश मिळवू, असा विश्वास माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
कराड येथे लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव, जयवंतराव पाटील, जयंतकाका पाटील, सुभाषकाका पाटील, अल्ताफ शिकलगार, फारूक पटवेकर, घनश्याम पेंढारकर यांच्यासह आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, गेली नऊ वर्षे पालिकेची निवडणूक न नसल्याने इच्छुकांची संख्या वाढली होती. अनेकांची समजूत काढत सर्व जाती-धर्मातील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळेल, याची काळजी घेतली. या शहराने 43 वर्षे सलग आदर्श लोकप्रतिनिधित्व पहिले. पाणीपुरवठा, सांडपाणी योजना, रस्ते, शाळा, नगरपालिका इमारत आदी अनेक कामी आजही दिशादर्शक आहेत. या निवडणुकीत शहरातील पार्किंग व वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आधुनिक सुविधा असे प्रश्न जाहीरनाम्यात प्राधान्याने समाविष्ट करणार आहोत. आघाडीचे नगराध्यक्ष पदासह 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, एका प्रभागात आमचा उमेदवार नाही.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, शहरातील मूलभूत नागरी सुविधांचे जाळे सक्षम करणे, ही आमची प्राथमिकता असेल. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार पुढील पन्नास वर्षांचा दृष्टीकोन ठेवून शहराच्या प्रगतीसाठी काम करू. तसेच सायंकाळी दत्त चौक-शिवतीर्थ परिसरातून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिन्हाच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, पूर्वीच्या दोन निवडणुकांत कराडमध्ये आघाडी चालली, चिन्हाचा प्रश्न आला नाही. या निवडणुकीत काहींच्या आग्रहामुळे ते शक्य झाले नाही. तरीही समविचारींच्या पाठबळावर आम्ही निवडणूक लढवतो आहोत. पी. डी. पाटील घराण्याचा उमेदवार या निवडणुकीत थेट नसल्याबाबत लोक भावना व्यक्त करत आहेत, मतदानातून त्या दिसतीलही. पण आम्ही माघार घेतलेली नसून, नव्या चेहऱ्याला संधी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीत काय चर्चा झाली? या प्रश्नावर राजेंद्रसिंह यादव म्हणाले, या भेटीत आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्या तब्येत विचारून केली, तसेच त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत. गावाच्या विकासासाठी साथ देणाऱ्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. कॉंग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणूक रिंगणात असला तरी, विकासाचा दृष्टीकोन ठेवून कोणाला पसंती द्यायची, हे लोक ठरवतील, असे मत त्यांनी सांगितले.
आघाडीसोबत जाण्याची भूमिकेबद्धल बोलताना माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर म्हणाले, आमचा भाजपला विरोध नाही. पण उमेदवारी वाटपात झालेल्या अन्यायकारक प्रक्रियेबद्दल नक्कीच नाराजी आहे. वर्षानुवर्षे निष्ठेने काम केले, तरीही आम्हाला डावलण्यात आले. म्हणूनच या चुकीच्या निवड प्रक्रियेविरोधात वेगळी भूमिका घेणे भाग पडल्याचे त्यांनी सांगितले.



