मनोहर शिंदे यांना शुभेच्छाच दिल्यास असत्या – पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : –
मनोहर शिंदे यांनी भाजप प्रदेशाच्या निर्णयाची कल्पना दिली असती तरी, त्यांना मी आशीर्वाद दिला असता. मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत मला बाहेरून समजले, ही खंत आहे. शिंदे यांच्याशी घरचे संबंध होते, ते कायम राहतील. त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव पाटील उपस्थित होते.
कराड नगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडी शक्य न झाल्याने काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरली असून, शहराध्यक्ष अमित जाधव यांनी नगराध्यक्षपदासह १६ प्रभागांत उमेदवार दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचाही एक उमेदवार असून, त्यांचाही आम्ही प्रचार करणार आहोत. मलकापुरात मात्र आघाडी होऊ शकत नसल्याने तेथे काँग्रेसने निवडणूक न लढविता समविचारी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
यावेळी शहराध्यक्ष ॲड. जाधव यांनी कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीबाबत प्रयत्न होते, मात्र त्याला यश आले नाही. नगराध्यक्षपदासह 16 प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिले असून, त्यांचा प्रचार सुरू आहे. काँग्रेसच्या माध्यमातून शहरात केलेली विकासकामे घेऊन आम्ही नागरिकांसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



