कराड नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची तयारी
महाविकास आघाडीसाठीही प्रयत्नशील; लवकरच पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळावा

कराड/प्रतिनिधी : –
कराड नगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून, महाविकास आघाडीचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॉलनी येथील निवासस्थानी झालेल्या काँग्रेसच्या प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. अमित जाधव, माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, माजी अध्यक्ष ऋतुराज मोरे, जेष्ठ नेते विठ्ठलराव शिखरे, माजी नगरसेवक अशोक कोळी, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे, श्रीकांत मुळे, हणमंत घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत बोलताना युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, कराड पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा पर्यायही विचाराधीन आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच अंतिम रणनिती निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंद्रजीत चव्हाण यांनी, कराड शहराने चव्हाण कुटुंबावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तेपेक्षा सेवेला प्राधान्य दिले. जनतेच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही लोकांच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. अमित जाधव म्हणाले, काँग्रेस हा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. कराड शहरातील अनेक विकासकामे ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातील आहेत. या विकासाच्या आधारे काँग्रेस पक्ष भाजपला पराभूत करण्याची ताकद राखतो.
बैठकीत झाकीर पठाण, राहुल चव्हाण, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, इरफान सय्यद, शरद गाडे, अक्षय सुर्वे, अमित माने आदी इच्छुक उमेदवारांनीही आपली मते मांडली.
लवकरच पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरस्तरीय मेळावा घेऊन पुढील रणनिती जाहीर केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शहरातील सर्व प्रभागांमधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सूत्रसंचालन ॲड. नरेंद्र चिंगळे यांनी केले, तर जितेंद्र ओसवाल यांनी आभार मानले.



