कृष्णा घाट, मंदिरे परिसर अन् नक्षत्र उद्यान तेजोमय

कराड/प्रतिनिधी : –
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज बुधवारी सायंकाळी प्रथेप्रमाणे अवघा कृष्णा घाट, मंदिरे परिसर अन् नक्षत्र उद्यान दिपज्वालांनी प्रकाशमान झाले. निमित्ताने ग्रामदेवता कृष्णामाईची विशेष पूजा बांधण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या आकर्षक आतिषबाजीने या उत्सवाला अधिक रंगत आणली.
दीपावलीनंतर येणारा हा विशेष सण देव- दानव संग्रामातील देवांच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. त्रिपुरारी राक्षसाचा वध झाल्यानंतर देवांनी केलेल्या उत्सवापासूनच देवदीपावली साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. त्यानिमित्त हजारो दिवे लावून देवदीपावली साजरी केली जाते. याप्रसंगी कृष्णा घाट समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बुधकर, विठ्ठलराव शिखरे, अमित बुधकर, सदानंद गरुड, विश्वनाथ जोशी आणि कार्यकर्त्यांनी घाट परिसरात दिव्यांची सुरेख सजावट केली होती.
कराडचा दीपोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवात हजारो दिव्यांच्या प्रकाशाने अवघा परिसर उजळून निघाला होता. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव कृष्णा घाट समितीतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यास कराडकर नागरिक व कृष्णामाई भक्तगणांचा चांगला प्रतिसादही लाभला. त्यात अनेक महिला भाविकांनी कृष्णा काठावर तिळाच्या तेलाचे दिवे प्रज्वलित करून, दीपदान केले. संध्याकाळपासून परिसरात प्रकाशदीप आणि भक्तिभावाचे वातावरण सर्वदूर पसरले होते.
दरम्यान, कृष्णा घाट उत्सव समितीतर्फे वर्षभरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात कृष्णामाई मंदिर सुशोभीकरण, घाट परिसर स्वच्छता मोहीम, विविध भक्तिगीतांचे कार्यक्रम आदींचा समावेश आहे. तसेच समितीमार्फत विकसित केलेल्या नक्षत्र उद्यानाला भाविकांसह नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कृष्णामाई मंदिरात नवरात्रोत्सव, यात्रा कालावधी आणि विशेष सण समारंभ या निमित्त देवीची वेगवेगळ्या रूपातील पूजा बांधली जाते. आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त देवीची सिंहावर आरूढ अशी विशेष पूजा बांधण्यात आली होती. तर, महिला भाविकांनीही घाट परिसरात दीप प्रज्वलन करून कृष्णामाईचे भक्तीभावाने दर्शन घेतले.


