सातारा जिल्हाहोम

कराड व मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

कराड/प्रतिनिधी : –

कराड व मलकापूर नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. कराड शहरात 74 तर मलकापूरमध्ये 33 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती कराडचे प्रांताधिकारी तथा नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे आणि मलकापूरच्या तहसीलदार तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल पाटील उपस्थित होते.

कराड नगरपालिकेत 15 प्रभागांतील 69 हजार 886 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 15 प्रभागातून 31 सदस्य निवडून दिले जाणार असून निवडणूक कार्यालय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात स्थापन केले आहे. मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, 5 भरारी पथके, 2 व्हिडिओ पाहणी, 2 सर्वेक्षण व 6 स्थिर पथके अशी नियंत्रण यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

मलकापूर नगरपालिकेत 25 हजार 174 मतदार असून 11 प्रभागांतून 22 सदस्य निवडले जातील. निवडणूक प्रक्रिया दैत्यनिवारणी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडेल. उमेदवार अर्ज 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत दाखल करू शकतील. 18 नोव्हेंबर रोजी छाननी, 25 नोव्हेंबर अर्ज माघारीची अंतिम तारीख, 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप, तर 2 डिसेंबरला मतदान व 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Related Articles