सातारा जिल्हाहोम

इस्लामपूरच्या नावात उरूणचा समावेश करणारा केंद्राचा अध्यादेश निघाला का? 

ईश्वरपूर/प्रतिनिधी : – 

उरूण इस्लामपूर नगरपालिकेचे उरूण ईश्वरपूर असे नामकरण झाले. मात्र शहराचे नांव ईश्वरपूर असे राहिले आहे. शहराच्या नावात उरूणचा समावेश करण्यासाठी केंद्राच्या सहमतीने अध्यादेश निघायला हवा, तो निघाला आहे का? असा सवाल करून सत्ताधारी मंडळी शहरातील जनेतची दिशाभूल करून नागरिकांच्या श्रद्धा आणि भावनेशी खेळत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी आंदोलनास पाठबळ देत या प्रश्नाचा पाठपुरावा केला. तसेच राज्याचे तत्कालीन मा. राज्यपाल यांनी राज्य सरकारला अध्यादेश काढण्याचा आदेश दिल्याबद्दल आम्ही शहरातील जनतेच्या वतीने दोघांचे अभिनंदन करतो, अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक शैलेश पाटील, शहराच्या ईश्वरपूर नावात उरूणचा सहभाग करावा म्हणून केलेल्या आंदोलनातील कार्यकर्ते सुहास पाटील, नितीन पाटील (दादा), संदीप माने, सुहास पाटील, प्रविण पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

शहाजी पाटील म्हणाले, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाई गडबडीत हा अपुरा निर्णय घेतला आहे. शहराच्या नावात उरूणचा समावेश व्हावा ही शहरातील जनते ची लोक भावना आहे. त्यासाठी उरूणातील विविध भावक्या व समाजाच्या वतीने २० दिवसाचे तीव्र आंदोलन केलेले आहे.

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील आंदोलन स्थळी भेट दिली. त्यांनी १७ ऑगस्टला राज्याचे तत्कालीन मा.राज्यपाल यांना पत्र लिहून आम्हा काही कार्यकर्त्यांना घेऊन भेटले. त्यानंतर मा.राज्यपालांनी राज्य सरकारला तसा अध्यादेश काढण्याचे आदेश दिले आहेत.

खंडेराव जाधव म्हणाले, उरूण इस्लामपूर नगरपालिकेने जो ठराव केला होता,त्यामध्येच उरूण समावेश नव्हता. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शहराचे नांव ईश्वर पूर झाले, मात्र त्यामध्ये उरूणचा समावेश कुठे आहे? आता आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ. यानंतर न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई करू.

सुहास पाटील म्हणाले,इस्लामपूर व उरूण भागात दोन वेग-वेगळ्या चावड्या आहेत. त्यामुळे ही दोन्ही वेग-वेगळी गावे आहेत, हा प्रचार दिशाभूल करणारा आहे. उरूण हेच मुख्य आणि ऐतिहासिक,सांस्कृतिक शहर आहे. या शहराच्या नावात उरूणचा समावेश झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

Related Articles