राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या जय्यत तयारीचा शुभारंभ

इस्लामपूर/प्रतिनिधी : –
येथील पोलीस परेड मैदानावर येत्या १३ नोव्हेंबरपासून सलग चार दिवस व्हॉलीबॉलचे धुमसान रंगणार असून या राज्यस्तरीय स्पर्धेच्या जय्यत तयारीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,व्हॉलीबॉल असोसिएशनचे जिल्हा सचिव प्रा.संदीप पाटील,शिवछत्रपती पुरस्कार विजेते पोपट पाटील (सर),जेष्ठ खेळाडू प्रकाश पाटील (येलूर),राजेंद्र सातपुते (इस्लामपूर),प्रा.दुष्यंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन व सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने या लोकनेते राजारामबापू पाटील वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन येत आहे. संपूर्ण राज्याच्या विविध जिल्ह्यातून २३ पुरुषांचे, तर २० महिलांचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी पोलीस परेड मैदान येथे ४ मैदाने तयार केली जात असून, या मैदानावर दिवस- रात्र अशा दोन्ही सत्रात सामने खेळविण्यासाठी भव्य प्रकाशझोत व्यवस्था केली जात आहे. मैदानाच्या पश्चिम बाजूस व्यासपीठ, उत्तर व पूर्व बाजूला क्रीडाप्रेमींना बसण्या साठी गॅलरी व्यवस्था केली जात आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असणार आहे.
इस्लामपूर हे शहर व्हॉलीबॉलची पंढरी म्हणून राज्यात ओळखले जाते. यापूर्वी या शहरात सन १९८३, १९८७, १९९५ व २००३ साली अशी चार वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन केलेले आहे. तसेच २०२२ साली राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली भव्य राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील नेत्रदीपक खेळाचा आनंद शहर,तालुका व जिल्ह्यातील हजारो क्रीडाप्रेमींनी घेतला होता..तसेच घुमसान पुन्हा रंगणार असल्याने क्रीडाप्रेमीमध्ये या स्पर्धेबद्दल मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.
याप्रसंगी व्हॉलीबॉलचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रकाश शेळके,राहुल पवार,बटू कारंजकर,दिनकर कोळेकर,जालिंदर जाधव, नरेंद्र पाटील,रमेश पाटील,आनंदराव वडार यांच्यासह खेळाडू, कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.



