ओंड नंबर १ सोसायटीच्या चेअरमनपदी पुण्यशीला मोरे, व्हाईस चेअरमनपदी छायाताई थोरात बिनविरोध
कराड/प्रतिनिधी : –
ओंड नंबर १ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, ता. कराड संस्थेच्या स्थापनेनंतर तब्बल ८५ वर्षांनी प्रथमच महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली असून, श्रीमती पुण्यशीला सुरेशराव मोरे यांची चेअरमनपदी, तर सौ. छायाताई सर्जेराव थोरात यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
गत पंचवार्षिक निवडणुकीत रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ सत्तेवर आले होते. त्यावेळी महिलांना नेतृत्वात संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या निवडीद्वारे त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली आहे.
चेअरमन पदासाठी श्रीमती पुण्यशीला मोरे यांचे नाव माजी चेअरमन राहूल थोरात यांनी सुचवले, तर अनुमोदन आनंदराव थोरात यांनी दिले.
व्हाईस चेअरमनपदासाठी सौ. छायाताई थोरात यांचे नाव लालासाहेब थोरात यांनी सुचवले व महेंद्र मोरे यांनी अनुमोदन केले. सभेचे कामकाज सतीश चव्हाण यांनी पाहिले, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कराड उपनिबंधक सहकारी संस्था मोरे यांनी काम पाहिले.
ओंड नंबर एक सोसायटीचे कार्यक्षेत्र ओंड, थोरात मळा, जाधव मळा व ओंडोशी या गावांपर्यंत पसरलेले आहे. विशेष म्हणजे, चेअरमनपदी निवड झालेल्या श्रीमती पुण्यशीला मोरे या ओंडोशी (ता. कराड) येथील असून, गावाला प्रथमच या पदाचा मान मिळाल्याने फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
निवडीनंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
श्रीमती मोरे या प्रसाद नागरी सहकारी पतसंस्था, मलकापूर येथे तब्बल २० वर्षांपासून अध्यक्षपदी कार्यरत असून, सहकार क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यास व अनुभव ओंड सोसायटीच्या प्रगतीस नक्कीच दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



