आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, आता बेमुदत उपोषण करणार – गणेश पवार यांचा इशारा

कराड/प्रतिनिधी : –
कापिल (ता. कराड) गावातील बोगस मतदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी गेल्या 27 दिवसांपासून प्रशासकीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनातून केली जात आहे. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कापिलचे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी शुक्रवार, दि. 7 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत बोलताना गणेश पवार म्हणाले, बाहेरगावच्या नऊ व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कापिल येथील पत्त्यावर आधारकार्ड तयार करून मतदान यादीत नावे नोंदवली. या बनावट मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदानही केले. या संदर्भात सर्व पुराव्यानिशी मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यांनी केवळ या बोगस मतदारांची नावे कमी करण्याचे आदेश देऊन गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप पवार यांनी केला.
ते म्हणाले, बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड तयार करून मतदान यादीत नावे नोंदवणे म्हणजे प्रशासन आणि निवडणूक विभागाची फसवणूक आहे. त्यामुळे संबंधित बोगस मतदारांविरोधात गुन्हे दाखल करणे आवश्यक असून, केवळ नावे कमी करणे हा कायद्याचा अवमान असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांनी कोणताही अधिकृत आदेश नसताना तब्बल 15 महिने निवडणूक विभागाचे काम केल्याचा आरोप पवार यांनी केला असून, त्यांचीही खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या गंभीर प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी आणि पुणे विभागीय आयुक्तांकडेही तक्रारी केल्या आहेत. मात्र, कुणीही दखल घेतलेली नाही. प्रशासनाने निष्क्रियता दाखवल्याने आता आम्ही अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
				


