सातारा जिल्हाहोम

गौरीशंकर कल्याणींच्या सहकाऱ्याला कराड पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स 

कराड/प्रतिनिधी : –

उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या कुटुंबातील मालमत्ता वाद प्रकरणात नव्या घडामोडी घडल्या आहेत. कराड पोलिसांनी गौरीशंकर कल्याणी यांच्या सहकाऱ्याला, प्रकाश हूनराव यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हूनराव हे मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी कराड पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत.

याबाबतची माहिती अशी की, सदर चौकशी HUF (Hindu Undivided Family) मालमत्तेच्या बेकायदेशीर हस्तांतरणाशी संबंधित आहे. सुगंधा हिरेमठ यांनी दाखल केलेल्या तक्रारीत गौरीशंकर कल्याणी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी कल्याणी यांच्यावर वडील डॉ. नीलकंठ कल्याणी यांच्या मालमत्ता फसवणुकीने स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप आहे.

सुगंधा यांच्या मते, गौरीशंकर यांनी वडिलांचा ‘पॉवर ऑफ अटर्नी’ (POA) घेऊन कराडमधील दोन मोठ्या मालमत्ता २००८ मध्ये स्वतःच्या नावावर केल्या. हा POA केवळ मालमत्ता व्यवस्थापनासाठी देण्यात आला होता; मात्र नंतर त्यात हस्तांतरणाचे अधिकार जोडण्यात आले. या प्रक्रियेत गौरीशंकर यांच्या कंपनीतील कर्मचारी प्रकाश हूनराव यांचा सहभाग होता.

तक्रारीनुसार, २००९ मध्ये नीलकंठ कल्याणी यांनी ही फसवणूक लक्षात आल्यानंतर POA रद्द केला आणि न्यायालयात दाद मागितली. न्यायालयीन कारवाईदरम्यान हूनराव यांनी गौरीशंकर यांच्या पत्नीच्या दबावाखाली दस्तऐवजांवर सही केल्याची कबुली दिल्याचा उल्लेख आहे. कराड पोलिसांकडून हूनराव यांची चौकशी मालमत्ता हस्तांतरणाच्या कायदेशीर वैधतेसंबंधी, त्यांना मिळालेल्या अधिकारपत्रांविषयी आणि व्यवहारामागील हेतूंबाबत होणार आहे.

दरम्यान, सुगंधा हिरेमठ यांनी न्यायालयात पुन्हा एकदा “HUF मालमत्तेसाठी प्रशासक नेमावा” अशी मागणी करण्याची तयारी केली आहे. त्यांनी “कर्ते म्हणून बाबा कल्याणी यांनी गौरिशंकर यांच्या कृतीकडे दुर्लक्ष का केले?” असा सवाल उपस्थित केला आहे. कल्याणी समूहाच्या आठ सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल सुमारे ५५,००० कोटी रुपये असून, इतर संपत्तीसह एकूण मालमत्ता ६०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Related Articles