श्री मळाई ग्रुपच्या माध्यमातून मराठवाडा पूरग्रस्तांना मदत

कराड/प्रतिनिधी : –
नैसर्गिक आपत्तीवेळी सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवत श्री मळाई ग्रुपतर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना परिसरातील दारफळ, तरडगाव, बोरगाव, बाळेवाडी आदी गावांमध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी नागरी पतसंस्था आणि श्री मळाई ग्रुपच्या वतीने प्रत्यक्ष जाऊन मदत पोहोचविण्यात आली.
शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाजात कुठेही आपत्ती आली की आपले कर्तव्य म्हणून त्या भागातील लोकांना मदत करणे आवश्यक आहे, या जाणिवेतून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेने ५७० अन्नधान्य किट्स, ८०० साड्या व ब्लॅंकेट्स पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविल्या.
या किटमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, साखर, चहा पावडर, तेल, तिखट, शेंगदाणा चटणी, पाच प्रकारच्या डाळी, शेवया, खाकरा आणि दोन साड्या अशा वस्तूंचा समावेश होता.
या मदतकार्याचे संपूर्ण नियोजन आणि संकल्पना संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात यांनी केली, तर चेअरमन अजित थोरात आणि संचालक मंडळाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला.
मदत पोहोचविण्याच्या कार्यात श्री मळाई ग्रुपमधील आप्पासाहेब गरुड, शिवाजीराव धुमाळ, भीमराव माहूर, तुळशीराम शिर्के, पाटील पंजाबराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पंढरपूर निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमरसिंह जमदाडे (दारफळ) आणि अमरसिंह साळुंखे (तरडगाव, बोरगाव, ता. करमाळा) यांनीही तळागाळापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी अनमोल सहकार्य केले.