जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा
कृष्णा विश्व विद्यापीठाच्या हृदयरोग विभागाच्यावतीने आयोजन

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा विश्व विद्यापीठाच्या हृदयरोग विभागाच्यावतीने जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त हृदयविकाराबाबत जनजागृती करणाऱ्या पोस्टर्स व रोगांळी प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हृदयाची काळजी आणि हृदयविकारांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने कृष्णा विश्व विद्यापीठाच्या हृदयरोग विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी रांगोळ्या व पोस्टर्स साकारुन हृदयविकाराबाबत समाजजागृती केली.
या स्पर्धेतील विजेत्यांना कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कृष्णा वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. युगांतरा कदम, हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके, डॉ. वसुंधरा घोरपडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. विजय कणसे म्हणाले, की आजच्या काळात कमी वयातील लोकांमध्ये हृदयरोग होण्याच्या घटना वाढत आहेत. अशावेळी महाविद्यालयीन युवकांमध्येही योग्य जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. हृदयविकार टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे.
डॉ. युगांतरा कदम यांनी आयुष्य जगण्याचे तत्वज्ञान व मानसिक स्वास्थ्य यावर मार्गदर्शन केले. त्यांनी द्वेष, राग, मत्सर आणि लोभ यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. मनाचे संतुलन हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. आर. जी. नानिवडेकर यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी ताण व्यवस्थापन, व्यायाम आणि योग्य आहार घेण्याची गरज व्यक्त केली. जीवनशैली बदलणे हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक इच्छाशक्तीवरही अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अभिजीत शेळके यांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार, योग्य जीवनशैलीचे पालन, वेळोवेळी वैद्यकीय तपासणी आणि आवश्यकतेनुसार तातडीने वैद्यकीय मदत घेतल्यास हृदयविकारामुळे होणारे ८० टक्के मृत्यू टाळता येणे शक्य असल्याचे नमूद केले.
डॉ. वसुंधरा घोरपडे म्हणाल्या, हृदयरोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. शालेय वयापासून मुलांमध्ये योग्य जीवनशैली रुजविली तर भविष्यातील धोके टाळता येतील. तसेच, स्वतःच्या शरीराशी संवाद साधणे, शरीरातील बदल समजून घेणे आणि संपूर्ण अवयवांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी डॉक्टर्स, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.