सातारा जिल्हाहोम

राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र

प्रा. अशोक चव्हाण व फिरोज पठाण यांची माहिती; निवृत्त न्यायमूर्ती पी. के. चव्हाण प्रशासक

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाने अपात्र ठरवली असून निवृत्त न्यायमूर्ती पी. के. चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे सहसचिव प्रा. अशोक चव्हाण आणि राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी दिली.

राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेचा भंग करून जुलै २०२४ मध्ये राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रा. चव्हाण, पठाण आणि राष्ट्रीय खेळाडू सचिन भोसले यांनी न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. न्यायमूर्ती अद्वैत सेठना आणि एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक प्रक्रियेला अपात्र ठरवत प्रशासक नेमण्याचा आदेश दिला. तसेच प्रशासकांना १५ दिवसांत कार्यभार स्वीकारण्याचे आणि चार महिन्यांच्या आत क्रीडा आचारसंहितेनुसार नव्याने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणात सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताराव पवार, कार्याध्यक्ष शामराव अष्टेकर, उपाध्यक्ष अमीर खान, अनंत गोखले, संजय शिंदे, नंदकुमार वाघ, सचिन पाटील, अमोल पाटील व सौ. सीमा जाधव यांच्या मान्यतेने याचिका दाखल करण्यात आली होती. “संघटनेची निवडणूक पारदर्शक व आचारसंहितेच्या चौकटीत व्हावी, एवढीच आमची अपेक्षा होती. पण मनमानी पद्धतीने निवडणूक घेण्यात आल्याने न्यायालयाची दार ठोठवावी लागली,” असे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.

या सुनावणीदरम्यान सातारा जिल्हा असोसिएशनच्या वतीने अ‍ॅड. वैभव गायकवाड आणि अ‍ॅड. हसन सय्यद, याचिकाकर्ते सचिन भोसले यांच्या वतीने अ‍ॅड. रफीक अहमद शेख, तर राज्य संघटनेच्या वतीने अ‍ॅड. गणेश गाडे यांनी युक्तिवाद केला. राज्यातील अनेक जिल्हा संघटनांनीही आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे त्यांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदोरे (पुणे), खजिनदार मंगल पांडे व इतर पदाधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळेच प्रशासक नेमण्याची वेळ आल्याचे पठाण यांनी नमूद केले.

दरम्यान, स्व. बबनराव उथळे यांच्या कार्यकाळातील सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कारभाराबाबतही धर्मादाय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र सुनावणी सुरू असल्याचे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.

Related Articles