कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार

कराड/प्रतिनिधी : –
कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त FIN CRIME EXPERT या संस्थेतर्फे ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स सेलच्या संचालिका सौ. कनिका वाधवान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे, महाव्यवस्थापक सलीम शेख, महाव्यवस्थापक महेश वेल्हाळ, उपमहाव्यवस्थापक अमित रेठरेकर यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.
सन 1999 पासून कार्यरत असलेले हे प्रशिक्षण केंद्र सहकारी संस्थांमधील सेवकांचे ज्ञान वाढवून त्यांच्या कार्यक्षमतेत आणि कौशल्यात भर घालत आहे. आजवर 70 हून अधिक बँका, 800 हून अधिक पतसंस्था आणि तब्बल 12 हजारांहून अधिक कर्मचारी या केंद्रामार्फत प्रशिक्षित झाले आहेत. तसेच 1300 पेक्षा अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून केंद्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून ‘KYC-AML’ विषयावर मराठीत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन सहकार क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हे केंद्र करीत आहे. या उपक्रमाची नोंद घेत FIN CRIME EXPERT या आंतरराष्ट्रीय संस्थेने कराड अर्बन बँकेच्या प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ने सन्मानित केले.
या यशाबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, डॉ. सुभाष एरम, समीर जोशी, अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी तसेच संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ आणि बँकेचे सभासद-ग्राहक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिंगटे व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.