सातारा जिल्हाहोम

श्री कालिकादेवी पतसंस्थेचा यशवंतराव चव्हाण कृतज्ञता पुरस्कार विश्वास पाटील व भाग्यश्री कुलकर्णी यांना जाहीर

शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा

कराड/प्रतिनिधी : –

श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, वैद्यकीय व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सन 2023-24 साठी हा पुरस्कार समाजसेविका सौ. भाग्यश्री कुलकर्णी-प्रभुणे (धुळे) यांना, तर सन 2024-25 साठी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे असून, शनिवार, दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी ४ वाजता सौ. वेणुताई चव्हाण सभागृह, कराड येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

समारंभाचे अध्यक्षस्थान सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील भूषवणार असून, प्रमुख पाहुणे राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ. अतुल भोसले व इंद्रजीत देशमुख (काकाजी) उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोककुमार चव्हाण, कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) व चेअरमन राजन वेळापुरे यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण जाधव, डॉ. संतोष मोहिरे, संस्थापक संजय मोहिरे व कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे उपस्थित होते.

कराड शिक्षण मंडळाचे माजी सचिव दिवंगत डॉ.रा.गो. प्रभुणे यांच्या कन्या सौ. भाग्यश्री कुलकर्णी-प्रभुणे गेली २२ वर्षे धुळे परिसरात समाजसेवा करत आहेत. बेवारस, निराधार, मनोरुग्ण, अनाथ मुले, कुष्ठरोगी, वृद्धाश्रमातील वृद्ध अशा वंचित घटकांची त्यांनी अखंड सेवा केली आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, नेपाळ या भागांतील तब्बल दोन हजारांहून अधिक निराधार व मनोरुग्णांना उपचार देऊन त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तर सन 2024-25 चा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी विपुल साहित्य लेखनातून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर केला आहे. ऐतिहासिक कादंबऱ्यांपासून ते सामाजिक विषयांवरील लेखनापर्यंत विविध अंगांनी त्यांनी साहित्य समृद्ध केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार, नाथ माधव पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय भाषा परिषद पुरस्कार, गडकरी पुरस्कार आदी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles