कराड दक्षिणामधील साठवण बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी ६४ लाख ३६ हजारचा निधी मंजूर

कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात साठवण बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून एकूण ६४ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून लवकरच नांदगाव, विंग आणि शेवाळवाडी (येवती) येथे साठवण बंधाऱ्यांची उभारणी केली जाणार आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही भागात दरवर्षी पाण्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमधून साठवण बंधाऱ्यांची मागणी होत होती. याची दखल घेत, आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करत, साठवण बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी निधीची मागणी केली होती.
त्यानुसार नांदगाव (१३.६५ लाख), विंग (१५.६१ लाख) आणि शेवाळवाडी (३५.१० लाख) येथे साठवण बंधाऱ्यांची उभारणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या साठवण बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवता येणार असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास हातभार लागणार आहे.
या निधीबद्दल शेतकरी व ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले जात आहेत.