पालकर शाळेस आदर्श शाळा पुरस्कार

कराड/प्रतिनिधी : –
येथील सोमवार पेठेतील (कै.) काशिनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालयास शिक्षणप्रेमी शाहीर आत्माराम यादव शैक्षणिक प्रतिष्ठान यांच्यावतीने आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यात शासकीय शाळांची पटसंख्या वेगाने घसरत असताना केवळ गुणवत्तेच्या जोरावर शाळेने केलेल्या अति उत्कृष्ट कामामुळे शाळेची पटसंख्या वेगाने वाढली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेने उज्वल यश संपादीत केले आहे.
शाळा नियमितपणे नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवत असते. विविध बाह्य स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थी नेत्रदीपक यश मिळवत असतात. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उत्तम आहे. यामुळे शाळेस आदर्श शाळा म्हणून सन्मानित करण्यात आले.
दिगंबर काशिनाथ पालकर शिक्षण समूहाचे अध्यक्ष आनंदराव पालकर, सचिव सौ. सुरेखाताई पालकर व सर्व संचालक मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन व शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ. वर्षाराणी पवार यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन, सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य, विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद व पालकांचे सहकार्य यामुळेच शाळेला हे यश मिळाले आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.