प्रभाकर घार्गेनी भविष्यकाळ ओळखून वाटचाल करावी – खासदार नितीन पाटील
पळशीत प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
राज्यात आगामी २० ते २५ वर्षांच्या काळात कोणाचे राजकारण चालणार, याचा विचार करून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी काळाची गरज ओळखून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी केले.
पळशी (ता. खटाव) येथे खटाव भाग अॅग्रो साखर कारखान्याचे अध्यक्ष, वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज घोरपडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रदीप विधाते, राजेश पाटील, राजेंद्र राजपुरे, मुख्य व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे, जितेंद्र पवार, संदीप मांडवे, युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे प्रमुख उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, आपण सर्वजण कपिस संस्कृतीत वाढलेले लोक आहोत. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार जोपासणाऱ्या नेत्याचा विचार करणे, हे आपले काम आहे. सद्यःस्थितीत ही विचारधारा जोपासणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय दुसरे नाव नाही. आगामी काळात तेच राजकारणात टिकून राहू शकतात. राजकारणाबरोबर जिल्ह्यातील साखर कारखान्याची स्थिती, प्रत्येक कारखान्याने वाढविलेली गाळप क्षमता याचा विचार करून ऊस उत्पादन वाढवण्याची गरज आहे, त्यासाठी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
श्री. घार्गे यांनी अडचणीच्या काळात सुरुवात करून यशस्वी उद्योजक म्हणून जिल्ह्यात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. खटाव तालुक्यात सहा लाख टन क्षमतेचा कारखाना उभारल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव, तसेच वेळेत तोड मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री. घार्गे म्हणाले, दुधाने तोड भाजल्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घेतला जाईल. काही झाले तरी, तालुक्यातील २५ ते ३० टक्के जनता आपल्याबरोबर आहे. राजकारणात काम करीत असताना अनेकांना संधी दिली, त्यापैकी काही प्रामाणिक राहिले. चुकीच्या पद्धतीने वा गणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवला जाईल. खासदार पाटील यांनी आम्हाला ताकद द्यावी. थोडे अडथळे दूर झाले, की निश्चितपणे खासदारांचा सल्ला शिरोधार्य मानला जाईल.
यावेळी आमदार घोरपडे, अनिल देसाई, राजेंद्र सरकाळे आदीनी मनोगत व्यक्त केले. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विवेक भोईटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर मार्गदर्शन केले. श्री. भोसले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विविध मान्यवर, तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.