कराड मर्चंटकडून सभासदांना १२ टक्के लाभांश – सत्यनारायण मिणीयार

कराड/प्रतिनिधी : –
कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. संस्थेच्या ठेवींमध्ये १०.५० टक्के, तर कर्ज वितरणात तब्बल १६ टक्क्यांची वाढ झाली असून, एकत्रित व्यवसाय तब्बल ९०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात हा व्यवसाय १००० कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास संस्थेचे कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार यांनी व्यक्त केला.
मागील वर्षीच्या तुलनेत संस्थेच्या नफ्यात २७ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण १७ कोटी ३० लाखांचा ढोबळ नफा, तर सर्व तरतुदी वजा करता ८ कोटी ८७ लाखांचा निव्वळ नफा संस्थेला झाला आहे. सभासदांनी दाखवलेल्या अढळ विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत यंदा सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेची आर्थिक घोडदौड सध्या संस्थेकडे ५२२ कोटींच्या ठेवी असून, ३६२ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. प्रभावी वसुलीमुळे संस्थेचे ढोबळ व निव्वळ एनपीए नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. संस्थेचे स्वनिधी ६२ कोटींवर पोहोचले आहे, तर विविध बँकांत ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे.
संस्थेच्या २७ शाखा कार्यरत असून त्यापैकी १८ शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर, क्यूआर कोड, स्पीकिंग बॉक्स अशा आधुनिक सुविधा सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व शाखा सीबीएस प्रणालीवर कार्यरत असून ग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सभेच्या प्रस्ताविक भाषणात संचालक डॉ. शरद क्षीरसागर यांनी संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेतला. चेअरमन माणीकराव पाटील यांनी ठेवींचा ५०० कोटींचा यशस्वी टप्पा गाठल्याबद्दल सभासदांचे आभार मानले. संचालक अरविंद कलबुर्गी यांनी सभासद, कर्जदार व सेवकांच्या सहकार्याचे कौतुक केले.
नेहमीप्रमाणे यंदाही संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले. कराड उपविभागीय कार्यालयात नागरिकांसाठी एअरपोर्ट बाकडी व जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. याशिवाय भगवान महावीर गोरक्षण ट्रस्ट, वाघेरी यांना १० लाखांची मदत, प्रयास आरोग्य गट, पुणे यांना १ लाख, तसेच पसायदान वृद्धाश्रम, कोल्हापूर यांना २ लाख ५१ हजारांची मदत संस्थेकडून देण्यात आली.